चिंचेला विक्रमी ९,६५५ रुपये दर
By Admin | Published: April 12, 2017 11:46 PM2017-04-12T23:46:34+5:302017-04-12T23:46:34+5:30
आवक कमी : जत बाजार समितीमध्ये गतवर्षीपेक्षा क्विंटलला तीन हजार जादा भाव
गजानन पाटील ल्ल संख
प्रतिकूल हवामान, कमी प्रमाणात झालेला पाऊस, वातावरणात कमी झालेले आर्द्रतेचे प्रमाण यामुळे जत तालुक्यात चिंचेच्या उत्पादनात घट झाली आहे. कमी उत्पादनामुळे बाजारात चिंचेची आवक कमी आहे. यावर्षी चिंचेला आठवडा बाजारात ७५ रुपये किलो दर मिळत आहे, तर बाजार समिती आवारात झालेल्या सौद्यात चिंचेला ९६५५ रुपये क्विंटल दर मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिंचेला तीन हजार रुपये दर मिळत आहे.
चिंचेचे उत्पादन कमी झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंच आंबटच राहणार आहे. उच्चांकी दर असूनसुध्दा शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळत नसल्याने शेतकरी उपाशीच राहिला आहे.
तालुक्यातील शेतीच्या बांधावर, पाटालगत, ओढ्यालगत चिंचेच्या झाडांची संख्या निसर्गत:च वाढलेली पाहावयास मिळते. शासनाकडून व सामाजिक वनीकरण विभागाकडून रस्त्याकडेला लावण्यासाठी चिंचेच्या झाडांनाच प्राधान्य दिल्याचेही पाहावयास मिळते. मागील काही वर्षांपासून प्रयोगशील शेतकरी चिंचेची शेतीही करूलागला आहे.
यावर्षी तालुक्यामध्ये जुलै महिन्यापासून सप्टेबरपर्यंत पाऊस झाला नाही. परतीच्या मान्सून पावसानेही पाठ फिरवली आहे. कमी पावसामुळे हवामान कोरडे असल्यामुळे जुलै महिन्यात चिंचेला फुलोरा आला नाही. आलेला फुलोराही प्रतिकूल हवामानामुळे गळून गेला. त्यामुळे चिंचेच्या उत्पादनात घट झाली आहे.
सध्या बाजारात चिंचेच्या विक्रीला सुरुवात झालेली आहे. आवक कमी असल्याने उच्चांकी दर मिळत आहे. माडग्याळ येथील आठवडा बाजारामध्ये ७५ रुपये किलो दर मिळत आहे. काही शेतकरी चिंचेची पोती भरून बाजारपेठेत सौद्यासाठी पाठवत आहेत. तेथेही चांगला दर मिळत आहे.
तासगाव ही चिंचेची पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव बाजारपेठ आहे. राज्यात तासगावशिवाय बार्शी, अहमदनगर येथेही चिंचेचे सौदे होतात. तासगाव ही जवळची बाजारपेठ असल्याने कर्नाटकातून ही चिंच तासगावात येते.
दरवर्षी जानेवारी ते एप्रिल असे चार महिने चिंचेचे सौदे सुरु असतात. चिंचेचे सौदे खुले होतात. कोल्हापूर, बेळगाव, सोलापूर, निपाणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील चिंचेचे व्यापारी चिंच विक्री आणि खरेदी करण्यासाठी येतात. ३७२ पोत्यांची आवक झाली. चिंचेच्या प्रतवारीप्रमाणे दर मिळाला. ८ हजार ते ९ हजार ६५५ रुपये क्विंटल दर मिळाला. गेल्यावर्षी चिंचेला ६ हजार ५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिंचेला तीन हजार रुपये जादा मिळत आहेत.
चिंचोक्यालाही विक्रमी दर
चिंच उत्पादक शेतकरी बी. आर. सावंत म्हणाले, कापड उद्योगात खळ करण्यासाठी चिंचोक्यांचा उपयोग होतो. चिंचोके खरेदी करुन, मुंबई, सोलापूर, इचलकरंजी, मालेगाव येथील कापड उद्योगात खळ तयार करण्यासाठी पाठविले जातात. स्टार्च, खळ, पावडर, बुक्का, कुंकू यांच्या निर्मितीत चिंचोक्यांचा वापर होतो. सध्या चिंचोक्यालाही १६० रुपये क्विंटल दर मिळत आहे. गेल्यावर्षी १८ ते २० रुपये किलो दर मिळाला होता. यंदा चिंचेचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात दर चांगला आहे. पण शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. यावर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. असे असले तरी उत्पादनच नसल्याने शेतकऱ्यांना मात्र दरवाढीचा कोणताही फायदा होणार नाही.