महिला अत्याचाराच्या घटनेवरुन चित्रा वाघ यांचे ठाकरेंवर टीकास्त्र, दोन्ही सरकारमधील सांगितला फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 01:18 PM2022-12-16T13:18:08+5:302022-12-16T13:18:46+5:30

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी राज्यातील अत्याचार पाहत बसण्याशिवाय काही केले नाही.

Chitra Wagh criticism of Thackeray on the incident of women abuse, The difference between the two Govt | महिला अत्याचाराच्या घटनेवरुन चित्रा वाघ यांचे ठाकरेंवर टीकास्त्र, दोन्ही सरकारमधील सांगितला फरक

महिला अत्याचाराच्या घटनेवरुन चित्रा वाघ यांचे ठाकरेंवर टीकास्त्र, दोन्ही सरकारमधील सांगितला फरक

Next

सांगली : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी राज्यातील अत्याचार पाहत बसण्याशिवाय काही केले नाही. आमच्या सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेविषयीचे कडक कायदे करीत आहोत. हा दोन्ही सरकारमधील मोठा फरक आहे, असे मत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.

येथील टिळक स्मारक मंदिरात महिला मोर्चाचा जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा नगरसेविका स्वाती शिंदे, माजी महापौर संगीता खोत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष प्राजक्ता कोरे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे आदी उपस्थित होते.

वाघ म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात भयमुक्त राज्याची निर्मिती होत आहे. आमच्यावर टीका करण्यापूर्वी महाराष्ट्रात तुमची सत्ता होती तेव्हा तुमच्यासमोर महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत होत्या. तेव्हा तुम्ही काय केले? कोणते कायदे केले? शक्ती, विशाखा असे मजबूत कायदे आमच्या पक्षाने आणले. मोदी सरकारकडून आता समान नागरी कायदा निर्माण होत आहे. त्यामुळे सामान्यांसह महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी या कायद्यांच्या माध्यमातून सरकारने घेतली आहे.

स्वाती शिंदे म्हणाल्या, घरेलू कामगार अंगणवाडी महिला यांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आघाडी काम करीत आहे. आमच्याकडे पाच हजार घरेलू महिला कामगारांची नोंद आहे. अशा सर्व घरेलू महिलांसाठी किमान हजार रुपये महिना पेन्शन द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. यावेळी प्रतापगडाचा लढा यशस्वी केल्याबद्दल नितीन शिंदे यांचा चित्रा वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

महापालिकेत पूर्णपणे भाजपची सत्ता

स्वाती शिंदे म्हणाल्या, सांगली महापालिकेत धोका देत भाजपकडे असलेली सत्ता राष्ट्रवादीने काढून घेतली. आता आम्ही सावध आहोत. सांगली महापालिकेत आगामी काळात पूर्णपणे भाजपची सत्ता येईल. यासाठी पक्षाच्या सर्व आघाड्या पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत.

Web Title: Chitra Wagh criticism of Thackeray on the incident of women abuse, The difference between the two Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.