दारूड्या तलाठ्याचा चोरोचीत धिंगाणा
By admin | Published: December 3, 2015 12:43 AM2015-12-03T00:43:28+5:302015-12-03T00:50:24+5:30
कार्यालयावर दगडफेक : कोतवालासह ग्रामस्थांना शिवीगाळ
कवठेमहांकाळ : चोरोची (ता. कवठेमहांकाळ) गावात बुधवारी तळीराम तलाठ्याने दारूच्या नशेत धिंगाणा घातला. तलाठी कार्यालयावर दगड फेकले आणि दरवाजाची मोडतोड केली. महाराष्ट्र सरकार दारूबंदी का करीत नाही, असा उलट सवाल करीत महिनाभर कामावर हजर करून न घेतल्याबद्दल खुलेआम हातात दारूची बाटली घेऊन दारू पित धिंगाणा घातला. कोतवालासह ग्रामस्थांना शिवीगाळ केली. कांतिलाल पितांबर साळुंखे असे त्याचे नाव असून, तो मूळचा येळवी (ता. जत) येथील आहे.
कांतिलाल साळुंखे याची एक महिन्यांपूर्वी चोरोची येथे तलाठी म्हणून नियुक्ती झाली आहे; परंतु अद्याप त्याला हजर करून घेतलेले नाही. तो मद्यपी असल्याची माहिती आधीच लागल्याने त्याची नियुक्ती रद्द करावी, असे पत्र ग्रामस्थांनी आमदार सुमनताई पाटील यांना दिले आहे.
बुधवारी दुपारी दोन वाजता साळुंखे चोरोचीच्या तलाठी कार्यालयाजवळ आला. त्यावेळी तो दारूच्या नशेतच होता. त्याने तलाठी कार्यालयावर दगड फेकले, तसेच दारावर लाथाही मारल्या. तलाठी कार्यालयात प्रवेश करून तेथे कामासाठी आलेल्या ग्रामस्थांशी हुज्जत घालण्यास व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु दारूच्या नशेत बेभान झालेल्या साळुंखे याने गावाच्या पारावरच सभा सुरू केली.
‘अण्णासाहेब, तुम्ही कामावर असताना दारू का पिता? तुम्हाला कोणी परवानगी दिली?’ असा सवाल ग्रामस्थांनी करताच ‘मला एम.डी. पदवी असलेल्या डॉक्टरांनीच दारू पिण्याची परवानगी दिली आहे. डॉक्टरच सांगतात, तुमच्या शरीराला अल्कोहोलची गरज आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच मी दारू पितो,’ अशी गमतीशीर उत्तरे त्याने दिली. ‘तुम्ही दारू पिल्याबद्दल शासनाला किंवा महसूलमंत्री एकनाथ खडसेंना सांगितले तर तुमची चौकशी होईल,’ असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर त्याने कहरच केला. ‘दारू कोणाची? शासनाची! ‘सरकारमान्य दारूचे दुकान’, असे दुकानावरच लिहिलेले असते, म्हणूनच मी दारू पितो. महसूलमंत्र्यांना माझा एक प्रश्न आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे, मग महाराष्ट्रात का होत नाही? एक हजार कोटींचा महसूल बुडतो म्हणून महाराष्ट्रात दारूबंदी होत नाही,’ अशी मुक्ताफळे त्याने उधळली.
त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सोडले नाही. ‘नरेंद्र मोदींना मी विनंती करतो. त्यांनी गुजरातमध्ये दारूबंदी केली, महाराष्ट्रात का नाही’, असा सवाल पंतप्रधानांना केला.
‘वरिष्ठांना कळवितो’, असे सांगताच,‘कळवा की! गेले चार महिने मला चार्ज दिला नाही. मी तहसीलदार डोंगरेलाही बोललो व नायब तहसीलदारालाही बोललो, तरीही मला चार्ज दिला नाही. मग, मी दारू पिणार नाही तर काय करणार?’, असा उलट प्रश्नही त्याने केला. त्यानंतर ‘जास्त’ झाल्याने त्याने तेथेच बसकण मारली. सायंकाळपर्यंत तो रस्त्याकडेला पडून होता. या घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे. (वार्ताहर)