ख्रिसमस : बंधुत्वाचा संदेश देणारा सण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:21 AM2020-12-25T04:21:24+5:302020-12-25T04:21:24+5:30
दरवर्षी २५ डिसेंबर रोजी नाताळचा सण साजरा करण्यात येतो. ख्रिश्चन बांधव या सणाला फार महत्त्व देतात. कारण जीझस ईश्वराचे ...
दरवर्षी २५ डिसेंबर रोजी नाताळचा सण साजरा करण्यात येतो. ख्रिश्चन बांधव या सणाला फार महत्त्व देतात. कारण जीझस ईश्वराचे पुत्र असल्याची त्यांची श्रद्धा आहे. नाताळ हा आनंद व हर्षोल्हासाचा सण आहे.
या दिवशी गिरिजाघरात प्रार्थना, कॅरॉल्सचे गायन करण्यात येते. शुभ कामांना कार्डस्ची घेवाण-देवाण होते. ख्रिश्चन बांधव नाताळच्या आगमनाच्या आधीपासूनच प्रार्थना व कॅरॉल्सच्या गायनास सुरूवात करतात.
संपूर्ण जगभरातल्या गिरिजाघरांमध्ये येशूची जन्मगाथा झाक्यांच्या रूपात प्रदर्शित केली जाते. चोवीस डिसेंबरच्या रात्रीपासूनच आरती व पूजा पाठास सुरूवात होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच जन्मदिनाचा सोहळा असतो.
ख्रिश्चन बांधव एक-दुसऱ्यांची गळाभेट घेऊन शुभेच्छांचे आदान-प्रदान करतात. गिरिजाघरात मंगल कामनेचे प्रतीक म्हणून ख्रिसमस-ट्री ची सजावट केली जाते. आज नाताळला धार्मिकतेसोबतच सामाजिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.
इंग्रजीभाषिक देशांमधील लोक या दिवशी एक विशेष प्रकारची पुडिंग व केक आदी बनवतात. भारताच्या नागरी भागात हा सण पश्चिमी देशांसारखाच साजरा करतात. या दिवशी सांता क्लॉज मुलांना मिठाई व भेटवस्तू देतो.
परंतु देशातील आदिवासी आणि खेड्यापाड्यांच्या लोकांचे खानपान या दिवशी वेगळे असते. तांदळाच्या रव्यापासून बनविलेला केक व केळी हा त्यांच्या जेवणाचा एक महत्त्वपूर्ण भाग असतो. आर्थिकरित्या संपन्न नसणाऱ्या घरात हे व्यंजन भेट म्हणून पाठविण्यात येते. दक्षिण भारतात काही भागात पायस वाटण्यात येतो.
परंपरावादी ख्रिश्चन लोकांसाठी हा सण प्रार्थना आणि आत्मशुद्धीचे कारण असते. म्हणून रोमन कॅथॉलिक्स संप्रदायाचे लोक एक डिसेंबरपासून पंचवीस डिसेंबरपर्यंत फक्त शाकाहारी भोजनाचे सेवन करतात.
ख्रिसमस झाड
नाताळ हा सण ख्रिसमस झाडाशिवाय कधीही पूर्ण होऊ शकत नाही. बऱ्याच काळापासून ख्रिसमस झाडाची सजावट करण्याची प्रथा आहे. ख्रिसमस झाड हे प्रभू येशू यांचे प्रतीक मानले जाते. नैसर्गिकरित्या देवदार वृक्ष ख्रिसमस झाड म्हणून वापरले जाते.
सांताक्लॉजचे वर्णन...
सांताक्लॉज किंवा सेंट निकोलस हे ख्रिसमस सणाचा एक अविभाज्य घटक आहेत. सांताक्लॉज ही काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीत ‘नाताळ बाबा’ असे म्हटले जाते. ख्रिसमस या उत्सवाबद्दल छोटी मुले खूप उत्सुक असतात. सांताक्लॉजचे चित्रण सामान्यतः बुटकी, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, लाल अंगरखा घातलेली आणि चष्मा लावलेली अशी व्यक्ती असते. त्या व्यक्तीजवळ लहान मुलांना देण्यासाठी भेटवस्तू भरलेली एक पिशवी असते
आई, वडील आपल्या मुलांकरिता आणलेल्या भेटवस्तू या सांताक्लाॅजने आणल्याचे सांगतात. सांताक्लाॅजच्या रूपातील व्यक्ती लहान मुलांना भेटवस्तू देते, त्यामुळे मुले फार आनंदी होतात. सांताक्लाॅजबद्दल प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल, आश्चर्य आणि कौतुक आजदेखील पाहायला मिळते. सांताक्लाॅज स्वर्गातून येतो आणि येताना प्रत्येकाच्या आवडीच्या गोष्टी आणतो, असा एक समज आहे.
ख्रिसमस सणाला केकचे महत्त्व
या सणाला केकचे खूप महत्त्व आहे. काही ख्रिश्चन लोक हे एकमेकांना भेट म्हणून केक देतात. ख्रिश्चन लोकांच्या घरी या सणाला विविध प्रकारचे फळांचे केक बनवले जातात.
गोवा या ठिकाणी तर नाताळची धूम फार अनोख्या पध्दतीने पाहायला मिळते. हा सण साजरा करण्याकरिता कित्येक पर्यटक देश-विदेशातून गोवा येथे येतात. सुटीचा मनमुराद आनंद लुटतात. गोव्याचे समुद्रकिनारे तर माणसांच्या गर्दीने फुलून जातात. गोवा येथे अनेक जुने चर्च देखील आहेत. त्यामुळे सुध्दा येथील नाताळ फार रंगीबेरंगी पध्दतीने साजरा होताना दिसतो.
मात्र यंदाचा ख्रिसमस हा नेहमीच्या ख्रिसमससारखा नाही. यावेळी ख्रिसमसवर कोरोनाचे सावट आहे. या संकटात आपल्याला शक्य तितकी स्वच्छता आणि सुरक्षितता बाळगायची आहे.