अंगणवाडी सेविकांचे सांगलीत चटणी-भाकरी आंदोलन, शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा
By अशोक डोंबाळे | Published: February 28, 2023 03:31 PM2023-02-28T15:31:12+5:302023-02-28T15:31:32+5:30
जिल्ह्यातील सेविकांसह पाच हजार मदतनीसांचे आठवड्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन
सांगली: जिल्ह्यातील सेविकांसह पाच हजार मदतनीसांचे आठवड्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. तरीही शासन दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर मदतनीसा, सेविकांनी चटणी भाकर आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केला.
किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. सेविका, मदतनीसांनी मानधनात वाढ, पोषण ट्रॅकर अॅप मराठीत करणे, नवीन मोबाइल, ग्रॅच्युइटी लागू करणे, आहार आणि इंधनाचे दर वाढवणे आदी मागण्यांकडे राज्य सरकार दोन वर्षांपासून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आंदोलन सुरु केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अंगणवाडी सेविका दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.
आधी थाळी नाद आंदोलन त्यानंतर लाटणे दाखवून आंदोलन करण्यात आले. मंगळवारी चटणी भाकरी हातात घेऊन अनोखे आंदोलन केले. लोकांच्या मुलांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविका काम करत असतात. मात्र केवळ आठ हजार रुपयांच्या मानधनात घर चालवताना त्यांच्या स्वतःच्या मुलांवर कुपोषणाची वेळ आली आहे. या अंगणवाडी सेविका आपल्या घरात चटणी भाकरच खातात. तेच दाखवण्याचा प्रयत्न आंदोलनाच्या निमित्ताने केल्याची प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांनी दिली आहे.
आंदोलनात शोभा कोल्हे, अरूणा नांगरे, आशा माळी, रेखा पाटील, शुभांगी कांबळे, संतोषी जाधव आदीसह हजारो सेविका, मदतनीसा भर उन्हात सहभागी होत्या.