सांगलीतील जतमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार, डोक्यात दगड घालून केला खून
By श्रीनिवास नागे | Published: March 17, 2023 03:24 PM2023-03-17T15:24:32+5:302023-03-17T15:49:31+5:30
नेमकी हत्या कोणी व का केली याबाबत जत पोलिस तपास करीत आहेत
जत : जत नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शिवाजीराव ताड (वय ४२, रा. जत) यांचा भरदिवसा गोळ्या घालून आणि थरारक पाठलागानंतर डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास सिनेस्टाईलने हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर फरार असून, खुनाचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे जिल्हाभर खळबळ माजली आहे. आठवड्यापूर्वी तालुक्यातील कोसारी गावी दोघांचा अशाच पद्धतीने भरदिवसा खून करण्यात आला होता.
विजय ताड शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख दिवंगत शिवाजीराव ताड यांचे पुत्र आहेत. दुपारी दीडच्या सुमारास ते मोटारीने घराजवळ असलेल्या अल्फोन्सा स्कूलमध्ये मुलांना आणण्यासाठी निघाले होते. शेगाव रस्त्यावरील शाळेजवळ वळत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या मोटारीवर गोळीबार केला. मोटारीला सेन्सॉर असल्यामुळे ती जागीच बंद पडली. त्यामुळे ताड यांनी मोटार सोडून जीव वाचविण्यासाठी घराकडे मधल्या रस्त्याने धाव घेतली.
शाळेच्या पाठीमागच्या बाजूने पळत असताना हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्यानंतर ते जमिनीवर पडले. जमिनीवर पडल्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला. आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले. हल्लेखोरांची संख्या पाच असल्याची चर्चा घटनास्थळी होती.
नगरसेवक ताड यांना राजकीय वारसा असल्यामुळे जत शहरातील व तालुक्यातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणला. तेथेही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन, अत्याधुनिक इन कॅमेरा, फॉरेन्सिक लॅब टेस्टसाठी व विच्छेदनासाठी मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयाकडे हलविण्यात आला.
दरम्यान, घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयास वरिष्ठ पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात येऊन घटनेबाबत माहिती घेतली व पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. हल्लेखोर फरार असून, खुनाचे कारण समजू शकले नाही.
ते म्हणाले की, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले आहे. अद्याप संशयित निष्पन्न झाले नसून, संशयितांच्या शोधासाठी तीन पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.
पाठीत दोन गोळ्या घुसल्या
पोलिसांना घटनास्थळी पिस्तुलाच्या तीन पुंगळ्या सापडल्या असून, मृत विजय ताड यांच्या पाठीत दोन गोळ्या घुसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.