इस्लामपुरात भाजीपाल्याच्या नावाखाली नागरिक सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:28 AM2021-04-23T04:28:14+5:302021-04-23T04:28:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : संचारबंदीत किराणा, भाजीपाला विक्री अशा अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : संचारबंदीत किराणा, भाजीपाला विक्री अशा अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू आहेत. मात्र आठवडी बाजार बंद झाल्याने इस्लामपुरातील भाजीपाला विक्रेते रहदारीच्या रस्त्यावरच बसतात. त्यामुळे तेथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर आहेच. शिवाय गर्दीमुळे वाहतूक कोंडीही होत आहे.
इस्लामपूर नगरपरिषदने भाजीपाला विक्रेत्यांना शहरात हातगाड्यावरून फिरून विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र इस्लामपूर-बहे या रहदारीच्या रस्त्यावर भाजी विक्रेते खुलेआम बसलेले असतात. याकडे पोलीस आणि पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने गर्दी होत आहे. कारवाई केल्यानंतरही पुन्हा हे भाजी विक्रेते रस्त्यावरच येऊन बसतात. यांच्यावर शासन यंत्रणेचा वचक नसल्याचे स्पष्ट होत आहे.
वाळवा तालुक्यातील इस्लामपूर ही मुख्य बाजारपेठ आहे. येथे ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि नोकरीनिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव होत आहे. तालुक्यात सरासरी रोज दोनशेवर रुग्ण सापडत आहेत. विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात वाहतूक पोलीस आघाडीवर असले तरी या कारवाईला आता नागरिक जुमानत नाहीत. विविध कारणाखाली नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे. विशेषत: सकाळच्या सत्रात भाजीपाला खरेदीच्या नावाखाली गर्दी होत आहे. भाजी विक्रेत्यांवर कडक निर्बंध घालण्याची गरज आहे.