सांगलीत मोबाईल चोरट्याला नागरिकांनी धू धू धुतले, संशयित पोलिसांच्या ताब्यात
By अविनाश कोळी | Published: October 4, 2023 12:09 PM2023-10-04T12:09:35+5:302023-10-04T12:10:47+5:30
चौघांनी १२ मोबाईल चोरले
सांगली : चौघांच्या टोळीने बुधवारी सकाळी सांगलीच्या विजयनगर, विनायकनगर परिसरात धुमाकूळ घालत तब्बल १२ मोबाईल लंपास केले. तरुणांनी एका चोरट्याला हुशारीने पकडले आणि त्याला धू धू धुतले. त्याचे अन्य तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरट्यास नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.
सांगलीत विजयनगर चौकापासून विनायनगरच्या शेवटच्या गल्लीपर्यंत चोरट्यांच्या टोळीने बुधवारी सकाळी धुमाकूळ घातला. सकाळी साडे सहा वाजता अनेक घरांच्या उघड्या दरवाजातून आत शिरत त्यांनी मोबाईल लंपास केले. रस्त्याने चालत जाणाऱ्या एका महिलेचाही मोबाईल त्यांनी हिसकावून दुचाकीवरुन पळ काढला. एवढे होऊनही याच परिसरात एका गल्लीत एकजण संशयितरित्या फिरत होता. एका तरुणाने त्याला पकडण्यासाठी धाव घेतली, मात्र चोरट्याने त्याच्यावर दगडफेक केली. तरुणाने ‘चोर...चोर’ असा आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा होऊन त्याला हुशारीने पकडले. त्याचे अन्य तिघे साथीदार लगेच दुचाकीवरुन पळून गेले.
पकडलेल्या चोराचे हात व पाय बांधून त्याला रस्त्याकडेला बसविण्यात आले. नागरिकांनी त्याला चोप दिला. वीस मिनिटे त्याला चोप दिल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. चोरट्याकडून एक मोबाईल हस्तगत करण्यात आला. अन्य कोणतीही वस्तू त्याच्याकडून मिळाली नाही.
‘सायबर’समोर आव्हान
गेल्या काही महिन्यांपासून दररोज मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. अशा चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान सायबर सेलसमोर निर्माण झाले आहे.