भिलवडीसाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी देण्याची नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:45+5:302021-05-25T04:29:45+5:30
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) गावाची लोकसंख्या, कामांचा व्याप व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, या सर्व बाबींचा विचार करता पूर्णवेळ ...
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) गावाची लोकसंख्या, कामांचा व्याप व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, या सर्व बाबींचा विचार करता पूर्णवेळ ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरीत आहे.
येथे कार्यरत असणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका ठेकेदारांकडून बारा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून कारवाई केली होती. या घटनेनंतर गेल्या आठ महिन्यांपासून भिलवडी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी हे पद रिक्त आहे. सुखवाडीचे ग्रामसेवक अजित पवार यांच्याकडे सध्या भिलवडी ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. अतिरिक्त पदभार असतानाही दोन्ही गावांचा कारभार ते चांगला चालवत आहेत.
भिलवडी गावची लोकसंख्या मोठी, त्यामुळे कामाचा व्याप मोठा. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, कामकाजाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मोठी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येतात, त्या ठिकाणी कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ राबवाव्या लागतात. पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून जिल्हा प्रशासनाने भिलवडी गावासाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.