स्थायी सभेत नागरिक घुसले

By Admin | Published: April 25, 2017 11:06 PM2017-04-25T23:06:28+5:302017-04-25T23:06:28+5:30

महापालिकेत पाण्यासाठी आंदोलन : राजू गवळींनी सभा रोखली

Citizens enter the permanent meeting | स्थायी सभेत नागरिक घुसले

स्थायी सभेत नागरिक घुसले

googlenewsNext



सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत मंगळवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. अण्णासाहेब पाटीलनगर, हनुमाननगर, सुभाषनगर, रुक्मिणीनगर या परिसरातील नागरिकांचे शिष्टमंडळ पिण्याच्या पाण्यासाठी थेट समितीच्या सभेतच घुसले. राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू गवळी यांनी सभापतींच्या आसनासमोर ठिय्या मारत सभेचे कामकाज रोखून धरले. अखेर सभापतींनी या परिसरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे आदेश दिले.
सभापती संगीता हारगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. सभेचे कामकाज सुरू असतानाच राजू गवळी यांच्या प्रभागातील अण्णासाहेब पाटीलनगर, लक्ष्मीनारायण कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी, रामकृष्ण परमहंस सोसायटी या परिसरातील नागरिकांचे शिष्टमंडळ स्थायी समितीत दाखल झाले. गवळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पाण्याबाबत तक्रार केली. या परिसरात गेल्या २१ दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. रात्री-अपरात्री कमी दाबाने पाणी येते. पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही हा प्रश्न निकालात निघालेला नाही, असे सांगत गवळी यांच्यासह मारुती आपटे, तानाजी पाटील, बाबा माने, लिहाज तांबोळी, मिलिंद काटकर, बबन सातपुते, शैला मुजावर या नागरिकांनी सभापतींच्या आसनासमोरच ठिय्या मारला. हा प्रश्न सुटेपर्यंत माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा गवळी यांनी घेतल्याने पदाधिकारी व अधिकाऱ्यांची कोंडी झाली.
यावर पाणीपुरवठाचे अभियंता धर्माधिकारी यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, शंभरफुटी रस्त्यावर रस्ते, ड्रेनेजची कामे सुरू आहेत. त्यामुळे पाईपलाईन फुटत आहे. त्याचा परिणाम काही भागातील पाणी पुरवठ्यावर झाला आहे. त्यावर नगरसेवकांनी त्यांना धारेवर धरले. ड्रेनेज कामामुळे पाणी कमी दाबाने येणार असल्याची माहिती नागरिकांना दिली आहे का? असा सवालही त्यांनी केला. यावर पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी मौन पाळले. अखेर सभापती हारगे यांनी तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. गुरुवारी सायंकाळी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, असेही सभापतींनी जाहीर केले.
हनुमाननगरमधील नागरिकांचे शिष्टमंडळ सभागृहात असतानाच नगरसेवक बाळासाहेब गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली सुभाषनगर, रुक्मिणीनगरमधील नागरिकांचे शिष्टमंडळही स्थायी समिती सभेत घुसले. त्यांनीही पाण्याबाबत तक्रार केली.
मारुती रस्त्याच्या पॅचवर्कचे कामही गेल्या कित्येक महिन्यापासून अपूर्ण असल्याची तक्रार शिवराज बोळाज यांनी केली. त्यावर सभापतींनी तातडीने काम सुरू करावे, अन्यथा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकू, असा इशारा दिला. (प्रतिनिधी)
सुभाषनगर कुठे आहे?
सुभाषनगर, रुक्मिणीनगरमधील नागरिकांनीही पाण्यासाठी साकडे घातले. नगरसेवक बाळू गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे शिष्टमंडळ आले होते. यावेळी गोंधळी यांनी पाणी पुरवठाचे अभियंता धर्माधिकारी यांना, सुभाषनगर कुठे आहे, माहीत आहे का? असा सवाल केला. त्यावर अधिकाऱ्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
कुपवाड लक्ष्मी देऊळ परिसरातील पार्श्वनाथ कॉलनी येथील जैन मंदिरासमोरील रस्त्यांच्या डांबरीकरणाला स्थायी सभेने मंजुरी दिली. या कामाचे १३ ते १४ लाख रुपये अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मे महिन्यात याठिकाणी पंचकल्याण महोत्सव होणार आहे. त्यासाठी नगरसेवक धनपाल खोत, विष्णू माने, प्रशांत पाटील यांनी महापौर व आयुक्तांकडे या परिसरातील रस्ते डांबरीकरण, पॅचवर्कचे काम करण्याची मागणी केली होती. सोमवारी महापौर व आयुक्तांनी या परिसराला भेट देऊन पाहणीही केली होती. स्थायी समितीने अल्पमुदतीची निविदा काढून रस्त्यांचे काम करण्यास मान्यता दिली.
वाहन खरेदीवर टोलेबाजी

स्थायी सभापती, आयुक्त यांना नवीन वाहन खरेदीच्या विषयावर सदस्यांनी टोलेबाजी केली. वाहन खरेदीला विरोध नसला तरी, आधी औषध फवारणी, रिक्षा घंटागाड्या खरेदी कराव्यात, अशी मागणी सदस्यांनी केली. शहरात एकच औषध फवारणीचे वाहन आहे. रिक्षा घंटागाडी खरेदीला मान्यता मिळाली आहे. या वाहनाची खरेदी अजूनही केलेली नाही. त्यापूर्वीच अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वाहन खरेदीची घाई कशासाठी, असा सवाल करण्यात आला. राजू गवळी यांनी मात्र वाहन खरेदीला लेखी विरोध नोंदविला.

Web Title: Citizens enter the permanent meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.