भरतवाडीत पुराच्या धोक्याने नागरिकांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:26+5:302021-07-23T04:17:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तांदूळवाडी : भरतवाडी (ता. वाळवा) येथे तीन दिवस झालेल्या पावसाने वारणेचेे पाणी पात्रबाहेर पडले आहे. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तांदूळवाडी : भरतवाडी (ता. वाळवा) येथे तीन दिवस झालेल्या पावसाने वारणेचेे पाणी पात्रबाहेर पडले आहे. यामुळे संभाव्य पुराचा धोका लाक्षात घेऊन गुरुवारी प्रशासनाने येथील नागरिक व जनावरांचे स्थलांतर केले आहे. सध्या या नागरिकांना कणेगाव (ता. वाळवा) येथे सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय केली आहे.
तांदुळवाडी परिसरात कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, भडकंबे, नागाव, कणेगाव, भरतवाडी आदी गावे येत असून, यापैकी कुंडलवाडी, तांदुळवाडी, कणेगाव व भरतवाडी या गावांतील शेतकऱ्यांची बरीच शेती ही वारणा नदीकाठी आहे. वारणा नदीकाठापासून भरतवाडी हे गाव एक किलोमीटर अंतरावर आहे. सध्या वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने नागरिकांना जनावरांसह स्थलांतर करण्याचे आवाहन केले.
तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी गुरुवारी दुपारी भरतवाडीत भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसेच योग्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात शासकीय यंत्रणेला सूचना दिल्या.
सध्या वारणेचे पाणी पात्राबाहेर पडल्याने काठावरील ऊस, भुईमूग, भात पिकांमध्ये पाणी शिरले आहे. कुंडलवाडी गावाला जोडणाऱ्या येलूर- तांदूळवाडी रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती.