सांगलीतील चिखलात रुतलेल्या रस्त्याला नागरिकांची श्रद्धांजली; नेते, अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत संताप
By अविनाश कोळी | Published: October 4, 2023 04:38 PM2023-10-04T16:38:42+5:302023-10-04T16:40:16+5:30
सांगली : ‘सहा महिने मृत्यू पावलेल्या खड्ड्याला समस्त नागरिक, विद्यार्थी व व्यापाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा आशयाचा फलक लावत ...
सांगली : ‘सहा महिने मृत्यू पावलेल्या खड्ड्याला समस्त नागरिक, विद्यार्थी व व्यापाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा आशयाचा फलक लावत सांगलीतील नागरिकांनी खड्ड्यांत व चिखलात रुतलेल्या रस्त्याला श्रद्धांजली वाहिली. लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी यांच्या नावाने बोटे मोडत नागरिक, विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
येथील चांदणी चौक, दमाणी हायस्कूल परिसरातील रस्ता गेल्या चार महिन्यांपासून उकरून ठेवला आहे. परिसरातील सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून गटारीच्या पाण्यातून, चिखलातून, खाचखळग्याच्या उकडलेल्या रस्त्यातून ये-जा करावी लागत आहे. तत्कालीन महापौर व सर्व नगरसेवकांना वारंवार सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. काही दिवसांपूर्वी गणेश मंडळांनाही या खराब रस्त्यावरच प्रतिष्ठापना करावी लागली होती. प्रशासकीय काळातही या रस्त्याकडे कोणी पाहिले नाही. ठेकेदाराने काम बंद केले आहे.
याचा संताप व्यक्त करीत प्रभाग क्रमांक सतरामधील नागरिक, महिला व शाळेच्या मुलांनी रस्त्यासह प्रभाग, सर्व प्रशासकीय अधिकारी, पुढाऱ्यांना श्रद्धांजली वाहत शंखध्वनी करीत संताप व्यक्त केला आहे. तशा आशयाचा मोठा फलकही झळकविण्यात आला. यावेळी महेश दासानी, रावसाहेब पाटील, महेश दरूरमठ, सतीश डांगे, किरण चव्हाण, प्रदीप मोर्चे, नीलेश स्वामी, आकांक्षा चौकीमठ, सुनील चौकीमठ, प्रकाश स्वामी, सुनील चौधरी, निखिल दामाणी आदी उपस्थित होते.