मिरजेतील पूरपट्ट्यातील नागरिक पुन्हा पुराच्या भीतीने धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:44+5:302021-06-18T04:19:44+5:30
मिरज : जोरदार पावसाने मिरजेत कृष्णाघाटावर पाणीपातळीत वाढ झाल्याने दोन वर्षांपूर्वी महापुराचा फटका बसलेले मिरजेतील पूरपट्ट्यामधील नागरिक या ...
मिरज : जोरदार पावसाने मिरजेत कृष्णाघाटावर पाणीपातळीत वाढ झाल्याने दोन वर्षांपूर्वी महापुराचा फटका बसलेले मिरजेतील पूरपट्ट्यामधील नागरिक या वर्षी पुन्हा पुराच्या शक्यतेने धास्तावले आहेत. यंदाही महापुराची शक्यता असल्याचे महापालिका प्रशासनाने कृष्णाघाटावरील नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा बजावत आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाच्या अंदाजामुळे मिरजेतील कृष्णाघाट, चांद कॉलनीसह अन्य उपनगरांतील नागरिक धास्तावले आहेत. कोरोना आपत्तीमुळे रोजगार गेल्याने हतबल झालेल्या नागरिकांना आता पुराच्या संभाव्य संकटाचा सामना करावा लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी मिरजेतील कृष्णाघाट, राजीव गांधीनगर, चांद कॉलनी, पिरजादे प्लॉट या शहराच्या विस्तारित भागात महापुराचा फटका बसला होता. चांद कॉलनीसह उपनगरात तब्बल १० दिवस येथील घरे सात ते आठ फूट पाण्याखाली होती. पुरात नागरिकांचे मोठे नुकसान झाले. यातून सावरत असताना गतवर्षी कोरोना व यावर्षी पुन्हा महापुराचा सामना करावा लागण्याच्या शक्यतेने नागरिकांनी स्थलांतराची तयारी केली आहे. गतवर्षी पूर आला नसल्याने दिलासा मिळाला होता. मात्र या वर्षीही चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याने पुन्हा महापुराचा धोका आहे. प्रशासनानेही पूरपट्ट्यातील रहिवाशांना स्थलांतराच्या लेखी सूचना दिल्या आहेत. कोणी मालमत्ताधारकांनी घरे मोकळी न केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचाही इशारा दिल्याने पूरपट्ट्यातील रहिवाशांत घबराट आहे. मिरजेतील चांद कॉलनी, राजीव गांधीनगरसह काही भागांतील रहिवाशांनी घरातील साहित्य हलविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी भाड्याच्या खोल्यांचा शोध सुरू केला आहेत. भाड्याची खोली घेण्याची परिस्थिती नसलेल्या पूरग्रस्तांना पुन्हा एकदा महापालिकेच्या निवारा केंद्रात आश्रय घ्यावा लागणार आहे.
चाैकट
दोन वर्षांपूर्वी पूरग्रस्तांनी नातेवाइकांकडे आश्रय घेतला होता. मात्र कोरोना साथीदरम्यान नातेवाइकांकडे आश्रय मिळणार नसल्याने प्रत्येकाला स्वत:ची व्यवस्था करावी लागणार आहे. चार दिवसांत नदीची पाणीपातळी आणखी वाढल्यास नागरिक स्थलांतराच्या पवित्र्यात आहेत.
चाैकट
महापालिका प्रशासनाने परिस्थितीपूर्वी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना कृष्णाघाटावरील रहिवाशांना दिल्या आहेत. यावर्षीही पुराची शक्यता असल्याने कृष्णा नदीच्या पुराचे पाणी घरात येण्यापूर्वी तुमचे आवश्यक साहित्य व पाळीव जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. स्थलांतरित न झाल्यास पुरामुळे तुमचे आर्थिक नुकसान व जीवितहानी झाल्यास त्याला महानगरपालिका जबाबदार राहणार नाही व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाईचा इशारा येथील नागरिकांना नोटिसीद्धारे बजावण्यात आला आहे.