नागरिकांनाच आता वाहतूक पोलीस बनण्याची संधी; महाट्रॅफिक अॅपची सुविधा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:25 AM2019-12-18T00:25:44+5:302019-12-18T00:26:42+5:30
वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने ‘महाट्रॅफिक अॅप’ ही सुविधा सुरू केली आहे. या अॅपमुळे नागरिकांनाही वाहतूक पोलिसांचे कर्तव्य बजावता येईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र काढून या अॅपवर टाकल्यास, वाहतूक पोलिसांना वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे सोयीचे होईल .
सांगली : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आता वाहनधारकांसाठी महागात पडणार आहे. वाहतूक पोलीस नसल्याचे पाहून नियम तोडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याला चाप लावण्यासाठी ‘महाट्रॅफिक अॅप’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी या अॅपवर नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांची छायाचित्रे अपलोड केल्यास संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने ‘महाट्रॅफिक अॅप’ ही सुविधा सुरू केली आहे. या अॅपमुळे नागरिकांनाही वाहतूक पोलिसांचे कर्तव्य बजावता येईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र काढून या अॅपवर टाकल्यास, वाहतूक पोलिसांना वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे सोयीचे होईल. ट्रिपल सीट, भरधाव वेगाने वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्टचा वापर न करणे, स्टॉप लाईन क्रॉस करणे, नो पार्किंगमध्ये गाडी लावणे, वाहनास फॅन्सी नंबर प्लेट बसविणे आदीसह वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे व अन्य वाहतूक नियम असोत किंवा अपघात होणे, रस्त्यावर आॅईल सांडून अपघात होणे, वाहने रस्त्यात ब्रेक डाऊन होणे, धोकादायक रस्ता आदी गोष्टींची माहिती छायाचित्र काढून या अॅपवर पाठवता येणार आहे.
एखाद्या नागरिकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहन चालकाचे छायाचित्र महाट्रॅफिक अॅपवर टाकल्यावर, वाहतूक शाखेतून त्या वाहनाची माहिती घेण्यात येईल. त्यांना मोबाईलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलचा संदेश पाठविला जाईल. नंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल व संबंधित तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.
छायाचित्र अपलोड : कसे कराल ?
महाट्रॅफिक अॅपवर गेल्यावर सिव्हिलियन रिपोर्ट असा फोल्डर आहे. त्यामध्ये व्हायोलेशन रिपोर्ट व इन्सिडंट रिपोर्ट असे विभाग आहेत. यातील व्हायोलेशन रिपोर्टमध्ये नागरिकांना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र काढून अपलोड करायचे आहे. तसेच इन्सिडंट रिपोर्टमध्ये अपघात झाला असल्यास किंवा अपघात घडण्याची शक्यता असेल व त्याठिकाणी पोलीस कर्मचारी नसेल, तर फोटो काढून टाकल्यास त्याची माहिती पोलिसांना होणार आहे.
पोलीस दलातर्फे महाट्रॅफिक अॅप सुरू करण्यात आले. गेल्या आठ दिवसात या अॅपवर शंभर ते दीडशे तक्रारी आल्या आहेत. अॅपबाबत पोलिसांकडून नागरिकांत जागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात वाहतूक पोलिसांची संख्या मर्यादित आहे. आता अॅपमुळे नागरिकांना वाहतूक पोलिसांचे कर्तव्य बजाविता येईल. तरी नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची छायाचित्रे अॅपवर पाठवून वाहतुकीला शिस्त लावण्यात योगदान द्यावे.
- अतुल निकम, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा