sangli news: मंत्री सुरेश खाडेंच्या गावचेच नागरिक विकास कामांवरुन नाराज, ग्रामस्थांची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 02:02 PM2023-01-17T14:02:13+5:302023-01-17T14:02:57+5:30
ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी
दत्ता पाटील
सांगली : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मूळ गावी तासगाव तालुक्यातील पेड याठिकाणी ग्रामस्थांनी निदर्शने केली. गावात मंत्री खाडे यांचीच सत्ता आहे. मात्र गावातील विकास कामांबाबत गावातील ग्रामस्थ नाराज असल्याने या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.
पेड गावामध्ये वरची गल्ली याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाण्याची व्यस्था नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेले दिसून आले. यामुळे आज पेड येथील ग्रामपंचायतीवर आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी गावातील तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास पाटील, ग्रामपंचायतिचे सदस्य राजेंद्र शेंडगे, पेड मल्हारराव वि.वि.कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन विजय शेंडगे, अभिजत शेंडगे, विश्वास शेंडगे, अविनाश शेंडगे आदी उपस्थित होते.
पेड हे साधारणपणे नऊ हजार लोकसंख्येचे गाव. याठिकाणी बऱ्याच भागामध्ये गटारी नाहीत. मागील पंचवार्षिक काळात सुरेश खाडे यांचे मोठे बंधू कै. दत्तू खाडे हे या गावचे सरपंच होते. यावेळी गावात मोठी विकास कामे झाली. दत्तू खाडे यांनी गावातील बहुतांश गटारींची कामे केली होती. मात्र काही भागात गटारी त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत. दरम्यान दत्तू खाडे यांचा काही दिवसांनी मृत्यू झाला. त्यानंतर लोकांच्या समस्या जैसे थे राहिल्या. याबाबात वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार येथील ग्रामस्थांनी केले. निवेदने देण्यात आली.
मात्र प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. आता संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतल्या नंतर प्रशासन घडबडून जागे झाले. आंदोलनाच्या एक दिवस आधी आंदोलकांना भेटून दोन महिन्याचे गटारींचे काम पूर्ण करू असे लेखी पत्र देण्यात आले. या पत्रामुळे आंदोलकांनी ग्रामपंचतीवर चिखलफेक न करता फक्त घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करत आंदोलन केले. येत्या दोन महिन्यात गटाराचे काम पूर्ण झाले नाही तर, तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी अभिजित शेंडगे यांनी दिला.