पाऊस नाही, तरीही धास्तीने स्थलांतराची तयारी; सांगलीतील परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 04:31 PM2022-06-16T16:31:02+5:302022-06-16T16:31:38+5:30
गेल्या काही वर्षांत सातत्याने पुराचा सामना नागरिकांना करावा लागल्याने येथील नागरिकांच्या मनात सध्या चिंतेचे वातावरण आहे.
सांगली : पावसाळा अद्याप सक्रिय झाला नसतानाही सांगलीत महापुराची चर्चा सुरू झाली आहे. पूर येणार, असे गृहीत धरून नदीकाठचे नागरिक व व्यापाऱ्यांनी आतापासूनच स्थलांतराची तजवीज केली आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने पुराचा सामना नागरिकांना करावा लागल्याने येथील नागरिकांच्या मनात सध्या चिंतेचे वातावरण आहे.
सांगलीत मागील तीन वर्षांत महापुराने व्यापारी पेठा व नागरी वस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐनवेळी होणारी तारांबळ येथील लोकांनी अनुभवली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच लोकांनी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी भाड्याने खोल्यांचे बुकिंग करण्यास किंवा नातेवाईकांना कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांतच पुराची टांगती तलवार नदीकाठच्या नागरिकांत असते.
सांगलीतील व्यापाऱ्यांकडून सतर्कता
- सांगलीच्या गणपती पेठ, हरभट रोड, मारुती रोड, कापड पेठ याठिकाणी सातत्याने पुराचा फटका बसत आहे. त्यामुळे पावसाळा म्हटला की, याठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या अंगावर काटा येतो.
- २०२१ मध्ये महापुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी आतापासूनच माल शहराबाहेरील गोदामात हलविण्यास व काहींनी तळघरातील माल काढून अन्यत्र ठेवण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांचीही पूर्वतयारी
नदीकाठच्या नागरिकांनीही ऐनवेळी धावाधाव नको, म्हणून नातेवाईकांना स्थलांतराबाबत पूर्वकल्पना दिली आहे. काहींनी तर दोन महिन्यांसाठी भाड्याने खोली शोधणे चालू केले आहे. मागच्या महापुरात अनेक नागरिकांना खोल्या मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे अगाऊ भाडे देऊन खोल्या बुकिंगची मानसिकता करण्यात आली आहे.
चिंता नुकसानीची
शासनाकडून नुकसानीएवढी मदत कधीच मिळत नसल्याने नदीकाठचे नागरिक व व्यापारी केवळ नुकसान टाळण्यासाठी धडपडत आहेत. एकीकडे शेतीसाठी पावसाची प्रतीक्षा केली जात असताना, दुसरीकडे जादा पाऊस पडू नये, म्हणून नदीकाठचे नागरिक, व्यापारी प्रार्थना करीत आहेत.