सांगलीत कोरोना कक्षाला नागरिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 04:28 PM2020-03-13T16:28:49+5:302020-03-13T16:29:37+5:30
कोरोनामुळे नागरिकांत आधीच भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा कक्ष नागरी वस्तीबाहेर न्यावा, अशी मागणी केली. यावेळी आयुक्तांनी नागरिकांसह नगरसेविका मदने, माने यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी विरोध कायम ठेवल्याने प्रशासनाची कोंडी झाली.
सांगली : कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी वालनेसवाडी येथील चेस्ट रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत विलगीकरण कक्ष सुरू करण्यास गुरुवारी स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध करीत आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह पोलिसांनी स्थानिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांचा विरोध कायम राहिल्याने अखेर प्रशासनाने मिरज मिशन रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेत, या वादावर पडदा टाकला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या सूचनेनुसार महापालिकेने कोरोना संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वालनेसवाडी येथील चेस्ट रुग्णालयाची इमारत निश्चित करण्यात आली. ही इमारत जुनी व पडिक आहे. या इमारतीत पूर्वी क्षयरोगावर उपचार केले जात होते. २० वर्षांपासून ही इमारत बंद आहे. महापालिकेने इमारतीच्या दुरुस्तीसह साफसफाई करण्याची तयारी चालविली होती. गुरुवारी सफाई कामगार स्वच्छतेसाठी तेथे गेले होते. यावेळी नारायण बेले, रूपेश कांबळे, विनोद मोरे, विनोद पांढरे यांच्यासह शेकडो महिला, नागरिक जमा झाले. त्यांनी विरोध करीत सफाईचे काम थांबविले.
नगरसेविका सविता मदने, विष्णू माने, अप्सरा वायदंडे, माजी नगरसेविका कांचन भंडारे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी कोरोना विलगीकरण कक्षाला विरोध करीत हा कक्ष शहराबाहेर हलविण्याची मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच आयुक्त कापडणीस, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे, भारती हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. डी. जी. मोटे यांनी वालनेसवाडीला भेट दिली. यावेळी नागरिकांनी आयुक्तांना घेराव घातला. वानलेसवाडीत ५०० हून अधिक नागरिक राहतात. नागरी वस्तीत कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणार का, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
कोरोनामुळे नागरिकांत आधीच भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा कक्ष नागरी वस्तीबाहेर न्यावा, अशी मागणी केली. यावेळी आयुक्तांनी नागरिकांसह नगरसेविका मदने, माने यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी विरोध कायम ठेवल्याने प्रशासनाची कोंडी झाली. यानंतर नागरिकांनी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. अखेर महापालिका प्रशासनाने पर्यायी जागेचा शोध घेऊन तेथे विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.