तासगावात दूषित पाणी पुरवठ्याविरोधात नागरिकांत संताप; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:04 PM2018-05-18T22:04:51+5:302018-05-18T22:04:51+5:30
तासगाव नगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होतो. याबाबत निवेदन देऊनही शुध्द पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पालिका गाठली.
तासगाव : तासगाव नगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होतो. याबाबत निवेदन देऊनही शुध्द पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पालिका गाठली. सुमारे शंभरहून अधिक नागरिकांनी एकत्रित येत मुख्याधिकाºयांकडे शुध्द पाणी देण्याची मागणी केली. यावेळी पाणी पुरवठा अधिकारी आणि नागरिकांत तणाव निर्माण झाला. हा तणाव निवळण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करून जमाव पांगवण्यात आला.
शहरातील मार्केट यार्डसमोरील कोळी, जाधव आणि पवार गल्लीत अनेक महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा होत असलेली पाईपलाईन लिकेज असल्यामुळे गटारीतील सांडपाणी या पाईपलाईनमध्ये मिसळत आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून या गल्लीतील लोकांना पिण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. सहा महिन्यांपूर्वी संबंधित नागरिकांनी पालिकेला याबाबत निवेदन दिले होते. मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना निवेदन देऊन स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. चार दिवसांत उपाययोजना न केल्यास पालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पालिकेत निवेदन देण्यासाठी आलेले नागरिक चांगलेच संतप्त झालेले होते. दूषित पाण्याच्या विषयावरून पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि नागरिकांत शाब्दिक चकमक झाली. पालिकेच्या आवारात तणावाचे वातावरण दिसू लागताच, पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. मुख्याधिकारी वायकोस यांनी पंधरा दिवसांत पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.