कोकरूडला नागरिकांनी रस्ता काम बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:26 AM2021-03-05T04:26:36+5:302021-03-05T04:26:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोकरूड : शिराळा ते मलकापूर या राज्य मार्गाच्या कामाबाबत अनेक वेळा संबंधित कंत्राटदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळवूनही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : शिराळा ते मलकापूर या राज्य मार्गाच्या कामाबाबत अनेक वेळा संबंधित कंत्राटदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळवूनही त्यात सुधारणा होत नसल्याच्या कारणावरून कोकरुड (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायत व इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी हे काम बंद पाडले.
तासगाव ते राजापूर या राज्य मार्गाचे काम कोकरूड परिसरात सुरू आहे. येथील कामाबाबत अनिल घोडे पाटील, उपसरपंच पोपट पाटील, अंकुश नांगरे, राजेंद्र नांगरे, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, दिलीप कोरे, मनोज पाटील व अन्य नागरिकांनी संबंधित कंत्राटदाराच्या पर्यवेक्षकास बोलावून घेतले. रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट प्रतीचे सुरू आहे, योग्य प्रमाणात खुदाई नाही, पुलाच्या भरावात काळी माती वापरली जात आहे, मुरमाचा, खडीचा वापर अत्यंत कमी आहे, माळेवाडी परिसरातील अर्धवट नाले बांधकाम पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात येऊनही त्यात सुधारणा न झाल्याने गुरुवारी हे काम बंद पाडले. ते चालू करू देणार नाही, अशा सूचना दिल्या.
उपअभियंता सुभाष पाटील कामाबाबत गंभीर नसून फोन उचलत नाहीत अथवा नागरिकांच्या शंकांचे निरसनही करत नाहीत. त्यामुळे नागरिकांचा संताप वाढत चालला आहे.