शहरी बस फेब्रुवारीपासून बंद

By admin | Published: January 6, 2017 11:15 PM2017-01-06T23:15:47+5:302017-01-06T23:15:47+5:30

महामंडळाचे महापालिकेला पत्र : पाच वर्षांत ४५ कोटींचा तोटा

City bus closed from February | शहरी बस फेब्रुवारीपासून बंद

शहरी बस फेब्रुवारीपासून बंद

Next

सांगली : गेल्या पाच वर्षांत एसटी महामंडळाच्या सांगली आगाराला शहरी बस वाहतुकीतून ४५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे सांगली महापालिकेने बससेवा ताब्यात घ्यावी अथवा ४५ कोटींची भरपाई द्यावी, असा प्रस्ताव राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिला आहे. हा प्रस्ताव महापालिकेने अमान्य केल्यास १ फेब्रुवारीपासून शहरी बससेवा बंद करण्यात येईल, असा इशारा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष रणजितसिंह देओल यांनी दिला आहे.
यासंदर्भात उपाध्यक्ष देओल यांनी ४ जानेवारीरोजी महापालिकेच्या आयुक्तांना पत्र दिले आहे. शहरी बससेवा बंद होण्याच्या वृत्ताने सांगली, मिरजेत खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून मात्र या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. राज्यातील रस्ते वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) स्थापना करण्यात आली.
महामंडळाकडून काही महापालिकांची हद्द वगळता संपूर्ण राज्यामध्ये टप्पानिहाय प्रवासी वाहतूक चालविली जाते. काही महापालिका, नगरपालिकांच्या हद्दीमध्ये शहरी वाहतूक व ग्रामीण भागासाठी ग्रामीण सेवा चालते. वास्तविक महापालिका हद्दीत प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. मात्र एसटी महामंडळाकडून सामाजिक बांधिलकी या नात्याने महापालिका हद्दीतही शहरी बससेवा सुरू आहे.
सांगली महापालिका हद्दीतही महामंडळाकडून शहरी बससेवा सुरू आहे. सांगली, मिरज, कुपवाडसह वीस-बावीस किलोमीटर अंतरातील काही ग्रामीण भागात सिटी बसेस सोडल्या जातात. दररोज महामंडळाकडून दैनंदिन सुमारे ५०० फेऱ्या होतात. मात्र गेल्या पाच वर्षात सांगली, मिरज, कुपवाड या तीन शहरांतील बस वाहतुकीतून महामंडळाला ४५ कोटी ३३ लाख ६९ हजार रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
महामंडळाची आर्थिक स्थितीही खालावलेली असून, अशा स्थितीत शहरी वाहतूक चालविणे महामंडळाच्या हिताचे नाही. त्यासाठी महापालिकेने शहरी बस वाहतुकीमुळे होणाऱ्या तोट्याची भरपाई करावी, असा प्रस्ताव महामंडळाचे उपाध्यक्ष देओल यांनी दिला आहे. महापालिकेने ४५ कोटी ३३ लाख रुपयांची भरपाई न दिल्यास १ फेब्रुवारीपासून शहरी बससेवा बंद केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधीं)
आतापर्यंत सहा प्रस्ताव : महापालिकेची होणार कोंडी
सांगली महापालिकेलगतच्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर या महापालिका शहरी बससेवा चालवितात. त्यामुळे सांगली महापालिकेनेही बससेवा ताब्यात घ्यावी, असा प्रस्ताव महामंडळाकडून देण्यात आला आहे. आतापर्यंत सहावेळा असा प्रस्ताव पालिकेकडे आला होता. पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी यापूर्वीच बससेवा चालविण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यावर निर्णय होऊ शकला नाही. आता महामंडळानेच बससेवा बंद करण्याचे पत्र दिल्याने पालिकेची कोंडी होणार आहे.

Web Title: City bus closed from February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.