नगराध्यक्षपदाचे ‘लॉबिंग’ सुरू

By admin | Published: December 6, 2015 11:19 PM2015-12-06T23:19:49+5:302015-12-07T00:25:29+5:30

तासगावात मोर्चेबांधणी : खासदारांच्या निर्णयाची उत्सुकता

City Mayor's 'lobbying' continues | नगराध्यक्षपदाचे ‘लॉबिंग’ सुरू

नगराध्यक्षपदाचे ‘लॉबिंग’ सुरू

Next

दत्ता पाटील -तासगाव नगरपालिकेत दोन महिन्यांपूर्वी भाजपची सत्ता आली. पहिल्या दोन महिन्यांसाठी ठरल्यानुसार सुशिला साळुंखेंना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. आता नव्याने नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता आहे. यासाठी इच्छुक नगरसेवकांकडून लॉबिंंग केले जात असल्याचे चित्र आहे.
तासगाव नगरपालिकेची साडेतीन वर्षापूर्वी निवडणूक झाली. तेव्हापासून वेगवेगळ्या घडामोडींनी राजकीय नाट्य सुरु आहे. दोन महिन्यांपूर्वी या नाट्याचा तिसरा अंक सुरु झाला. काँग्रेसचा टेकू घेऊन पालिकेवर वर्चस्व ठेवण्याचा आबा गटाचा डाव भाजपचे खासदार संजयकाकांनी मोडीत काढला. आबा गटाच्या काही शिलेदारांना भाजपमध्ये प्रवेश देत, तर काहींची सोबत घेत पालिकेत सत्तांतर घडवून आणले.
दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या सुशिला साळुंखे यांना दोन महिन्यांसाठी नगराध्यक्षपद दिले. ठरलेल्या कमिटमेंटनुसार साळुंखेंनी आठ दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र नवा नगराध्यक्ष कोण? हे निश्तिच झाले नसल्याने तासगावकरांची उत्सुकता ताणली गेली आहे.
आबा गटाचा हात सोडून काका गटात प्रवेश केलेल्या नगरसेवकांना नगराध्यक्षपदाची इच्छा आहे. अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकांनाही नगराध्यक्षपद हवे आहे. तर मुळे काका गटातून निवडून आलेल्या नगरसेवकांनाही नगराध्यक्षपदाची संधी आपल्यालाच हवी, अशी इच्छा आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीचा गुंता वाढला आहे. नगराध्यक्षपदासाठी नगरसेवकांतूनही लॉबिंग सुरु केले असल्याची दिसून येत आहे.
नगरसेवक कोणासाठी वजन वापरणार, याची चाचपणी होत आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्या भूमिकेवरच नव्या नगराध्यक्षांची निवड होणार, हे निश्चित आहे.


सत्ता गटात धुसफूस : पुन्हा ये रे माझ्या मागल्या...
तासगाव पालिकेत सत्तेत आल्यापासून माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना नगराध्यक्षपदासाठी टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी सामन्यासारखे कमी कालावधीसाठी निवड करावी लागली होती. तरीही काही नगरसेवकांनी नाराजी ओढावून घ्यावी लागली. त्यामुळे काही नगरसेवकांनी काका गटाचा रस्ता धरला. दोन महिन्यांपूर्वीदेखील अशाच नाराजीतून काही नगरसेवकांनी आबा गटाचा हात सोडला होता. आता काका गटातही नगराध्यक्षपदाची धुसफूस सुरू असून, नगराध्यक्षपदासाठी पुन्हा ये रे माझ्या मागल्या असेच चित्र दिसून येत आहे.


दोन सदस्यांची तयारी
नगराध्यक्षपदासाठी काका गटातून नगरसेवक बाबासाहेब पाटील आणि अविनाश पाटील या दोघांतच सद्यस्थितीत जोरदार रस्सीखेच होताना दिसून येत आहे. यावेळी संधी आपणालाच मिळावी, यासाठी दोन्ही नगरसेवकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.

Web Title: City Mayor's 'lobbying' continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.