शहर पोेलीस ठाणे, लकी बॅग्जवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:05 AM2017-11-14T01:05:34+5:302017-11-14T01:08:35+5:30
सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सीआयडीच्या पथकाने सोमवारी सांगली शहर पोलीस ठाणे व हरभट रस्त्यावरील लकी बॅग्ज या दुकानावर छापा टाकला. दोन्ही ठिकाणच्या सीसीटीव्हीचा ‘डीव्हीआर’ जप्त केला. तसेच अनिकेतच्या मृतदेहाची ‘डीएनए’ चाचणी करण्यासाठी त्याच्या आई, वडिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यांना लुबाडल्याप्रकरणी
अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना अटक केली होती. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. कोठडीत चौकशीवेळी ‘थर्ड डिग्री’चा वापर करून मारहाण झाल्याने कोठडीतच अनिकेतचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जंगलात जाळण्यात आला होता. याप्रकरणी निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, राहुल शिंगटे, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांना अटक केली आहे. सीआयडीचे अप्पर पोलीस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांचे पथक त्यांची चौकशी करीत आहे. चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर येत असून, त्याआधारे पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
शहर पोलीस ठाण्यात चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेतही सीसीटीव्ही कॅमेरा आहे. ६ नोव्हेंबरला रात्री साडेआठ ते नऊ यादरम्यान कामटेच्या पथकाने अनिकेतला बेदम मारहाण करून त्याचा खून केला होता. वरिष्ठ अधिकाºयांनी त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज पाहून नेमका प्रकार काय घडला होता, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण घटनेपासूनचे फुटेजच मिळाले नाही. यावरून कामटेच्या पथकाने हे फुटेज पुसून टाकले असण्याची शक्यता आहे. तपासाच्यादृष्टीने हे फुटेज महत्त्वाचे असल्याने, सीआयडीने सोमवारी शहर पोलीस ठाण्यावर
अनिकेत कोथळे हा हरभट रस्त्यावरील ‘लकी बॅग्ज’या दुकानात कामाला होता. घटनेआधी त्याचा दुकान मालक नीलेश खत्री याच्याशी पगारावरुन वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले होते. यामध्ये खत्रीचा हात मोडला आहे. खत्रीने एका मध्यस्थामार्फत कामटेला ‘सुपारी’ देऊन अनिकेतचा खून केला, असा आरोप अनिकेतच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे सीआयडीने लकी बॅग्जवर छापा टाकून त्याच्या दुकानातील सीसीटीव्हीचा ‘डीव्हीआर’ जप्त केला आहे. या दुकानात कोणाची उठ-बस होती, हेही तपासले जाणार आहे. सीआयडीने अश्लील सीडी प्रकरणाचा मुद्दाही चौकशीत घेतला आहे.
नातेवाईकांच्या तक्रारीची चौकशी
गायकवाड म्हणाले, अनिकेतच्या नातेवाईकांनी, आमची स्वतंत्र तक्रार घेऊन गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. त्यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. या अर्जात त्यांनी उपस्थित केलेल्या शंका, मुद्दे व काहीजणांच्या नावांबाबत चौकशी करण्याचे काम सुरु आहे. चौकशीत जर पुरावे मिळाले, तर कोणालाही सोडणार नाही. त्यांनाही आरोपी करुन अटक केली जाईल.
फिर्यादीला बोलाविले
कवलापूरच्या संतोष गायकवाड यांना लुबाडल्यानंतर या गुन्ह्णाची सुरुवात झाली. गायकवाड तपासाच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे सीआयडीने त्याला सोमवारी चौकशीसाठी बोलाविले होते. पण दिवसभरात तो आला नव्हता. कदाचित तो मंगळवारी चौकशीसाठी सीआयडीपुढे हजर होण्याची शक्यता आहे. तो अभियंता असून, मुंबईत नोकरी करतो. नांदणी (ता. शिरोळ) ही त्याची सासूरवाडी आहे. सध्या तो तिथे असल्याची माहिती सीआयडीला मिळाली आहे.
मृतदेहाची खात्री महत्त्वाची
गायकवाड म्हणाले, मृतदेह अनिकेतचाच आहे का, याची खात्री होणे महत्त्वाचे आहे. जर खात्री झाली तर आमचा ९० टक्के तपास पूर्ण होतो. यासाठी मृतदेह व नातेवाईकांची ‘डीएनए’ तपासणी केली जाणार आहे. चार दिवसांपूर्वी मृतदेहाचे काही नमुने घेतले होते. सोमवारी त्याच्या आई, वडिलांचे रक्त तपासणीसाठी घेतले आहे.
सांत्वनासाठी गर्दी
काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, ब्रिगेडियर सुधीर सावंत, आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी सोमवारी अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्याचवेळी त्यांनी गृहखात्यावरही टीका केली.
दोषारोपपत्र ९० दिवसांत : कुलकर्णी
अप्पर पोलीस अधीक्षक नरेंद्र गायकवाड म्हणाले की, घडलेली घटना अत्यंत घृणास्पद आहे. कामटेसह सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. ९० दिवसांत सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाईल. आरोपींची संख्या तसेच आणखी काही पुरावे मिळाले आहेत. त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास न्यायालयाकडून मुदत मागून घेतली जाईल.
कोथळे कुटुंबीयांना १० लाखांची मदत
पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत देण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी मुंबईत दिली. पोलीस कोठडीत यापुढे मृत्यू होऊ नयेत, यासाठी गृह खात्याची तातडीने बैठक बोलावण्यात आली असून, त्यावर चर्चा करून काय सुधारणा करता येतील यावर निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याच्या कोथळे कुटुंबीयांच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
दत्तात्रय शिंदे, दीपाली काळे
यांना नोटीस : नांगरे-पाटील
सांगली शहर पोलीस ठाणे संवेदनशील आहे. येथील पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके रजेवर असताना या पोलीस ठाण्याची जबाबदारी प्रभारी निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयास दिली पाहिजे. परंतु तसे न करता उपनिरीक्षकाला दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी कामात निष्काळजीपणा केल्यामुळेच गंभीर घटना घडली. या घटनेला जबाबदार धरत सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व शहर पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.