कुपवाडला मोर्चावेळी नागरिक-अधिकाऱ्यांची वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:15+5:302021-06-17T04:19:15+5:30
कुपवाड : येथील अलिशान कॉलनीतील नागरिकांनी बुधवारी रस्त्याच्या मागणीसाठी महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कार्यालयाचे ...
कुपवाड : येथील अलिशान कॉलनीतील नागरिकांनी बुधवारी रस्त्याच्या मागणीसाठी महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केल्याने अधिकाऱ्यांशी वादावादी झाली. पोलीस आणि नगरसेवक प्रकाश ढंग यांनी मध्यस्थी केली. सहायक आयुक्तांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
कुपवाड-मिरज रस्त्यावरील बडेपीरलगत मुजावर पट्टीमध्ये अलिशान कॉलनी आहे. मुख्य रस्त्यापासून कॉलनीच्या दिशेने जाण्यासाठी शेतजमिनीतून जावे लागते. या जमिनीवर रस्त्याचे आरक्षण पडले आहे. आरक्षणाच्या मोबदल्यासाठी शेतमालकांनी प्रयत्न केले; परंतु त्यांना महापालिकेने बेदखल केले. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी हा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने चर काढून बंद केला. आठ वर्षांपासून सुरू असलेली वहिवाट बंद केल्याने नागरिकांनीही आक्रमक भूमिका घेत महापालिकेच्या प्रशासनाला धारेवर धरले होते. अधिकाऱ्यांनी शेतमालकांची समजूत घालून मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु हा प्रश्न सहायक आयुक्तांनी रेंगाळत ठेवल्याने पुन्हा वाद पेटत गेला.
शेतमालकांनी मोबदला मिळाल्याशिवाय रस्ता खुला न करण्याची भूमिका घेतल्याने बुधवारी सकाळी नागरिकांनी प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढून सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांना रस्त्याबाबत जाब विचारला. यावेळी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यावरून नागरिक व अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. नगरसेवक प्रकाश ढंग आणि पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर सहायक आयुक्तांनी सायंकाळपर्यंत जागामालकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी विरेश तलारी, हबीब मुजावर, रोहित पिसे, मारुती पुजारी, सायरा मुजावर, नितीन वाघमारे, केशव्वा ददरगी, जयश्री तोरणे, राजू मुजावर, अनिता पवार उपस्थित होते.
चौकट
मुलभूत सुविधांचा बोजवारा
आलिशान काॅलनीमध्ये दोनशेवर नागरिक आहेत. रस्ता, दिवे व इतर मुलभूत सुविधा मिळत नाहीत. महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.
फोटो ओळ : कुपवाडमध्ये प्रभाग समिती तीनच्या कार्यालयावर रस्त्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. यावेळी नगरसेवक प्रकाश ढंग आणि सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्यामध्ये वादावादी झाली.