कोमात गेलेल्या बालकास ‘सिव्हिल’मुळे जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:58 PM2020-05-23T19:58:51+5:302020-05-23T20:00:11+5:30
अचानक त्याचा तोल गेला आणि जवळपास पाच फुटांवरून तो खाली जमिनीवर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो कोमात गेला. काही खासगी रुग्णालयांमध्ये घेऊन गेल्यानंतर तो कोमात गेल्याचे सांगण्यात आले. शस्त्रक्रियेचा खर्च जवळपास ५ लाखाच्या घरात जाईल, असेही सांगण्यात आले. गरीब पार्श्वभूमी असलेले हे कुटुंब हा आकडा ऐकून हादरले.
सांगली : कोरोनाचे संकट दाटले असताना, तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालयाने अनेक स्तरावर जबाबदाºया पार पाडत रुग्णांना दिलासा देण्याचे काम सुरू केले आहे. डोक्याला दुखापत होऊन कोमात गेलेल्या एका सातवर्षीय मुलाला व त्याच्या कुटुंबियांना संकटातून बाहेर काढण्याचे काम सांगलीच्या शासकीय रुग्णालयाने केले.
कोरोनाच्या संकटामुळे गेलेला रोजगार, ठप्प झालेल्या सेवा यामुळे अन्य कोणतेही संकट पचविण्याची ताकद आता सामान्य लोकांमध्ये राहिली नाही. तरीही संकट परिस्थिती पाहून येत नाही. त्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या व गरीब पार्श्वभूमी असलेल्या एका कुटुंबाच्या घरी मोठ्या संकटाने हजेरी लावली. कोल्हापूर रोडवरील एका उपनगरात राहणाºया जाफर पठाण यांचा सात वर्षाचा मुलगा जाहिद घराबाहेरील झोपाळ््यावर झुलत होता.
अचानक त्याचा तोल गेला आणि जवळपास पाच फुटांवरून तो खाली जमिनीवर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो कोमात गेला. काही खासगी रुग्णालयांमध्ये घेऊन गेल्यानंतर तो कोमात गेल्याचे सांगण्यात आले. शस्त्रक्रियेचा खर्च जवळपास ५ लाखाच्या घरात जाईल, असेही सांगण्यात आले. गरीब पार्श्वभूमी असलेले हे कुटुंब हा आकडा ऐकून हादरले.
मुलाच्या नातेवाईकांंनी खणभागातील सामाजिक कार्यकर्ते उमर गवंडी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील अधिकाºयांशी संपर्क साधून परिस्थिती सांगितली. शासकीय रुग्णालयाने हे आव्हान स्वीकारले. येथील डॉक्टर व त्यांच्या पथकाने अवघ्या दीड दिवसात शस्त्रक्रिया यशस्वी करून मुलाला शुद्धीवर आणले. मुलाला शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांकडे पहात पालकांनी हात जोडले आणि त्यांच्या डोळ््यातून अश्रू वाहू लागले. न्युरो सर्जन डॉक्टर अभिनंदन पाटील व त्यांच्या पथकाने कर्तव्यभावनेने त्यांना दिलासा दिला.
उपअधिष्ठाता प्रकाश गुरव, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष दळवी यांनीही तातडीने वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित केली. शस्त्रक्रिया होऊन मुलगा शुद्धीवर येईपर्यंत उमर गवंडी, फिरोज जमादार, शानवाज फकीर, हफिज इस्माईल, हफिज अश्रफ अली, साहिल खाटिक, जैद शेख, आजींमखाण पठाण, हाजी तोफीक बिडीवाले हे कार्यकर्ते रुग्णालयात थांबून होते. त्यांनाही पालकांनी धन्यवाद दिले.