रुग्णसेवेत ‘सिव्हिल’चा राज्यात चौथा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:40 PM2018-12-04T23:40:17+5:302018-12-04T23:40:21+5:30
सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गोरगरीब रुग्णांचा आधार म्हणून पश्चिम महाराष्ट्रात लौकिक असलेल्या सांगलीच्या शासकीय रुग्णालयाने ...
सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गोरगरीब रुग्णांचा आधार म्हणून पश्चिम महाराष्ट्रात लौकिक असलेल्या सांगलीच्या शासकीय रुग्णालयाने (सिव्हिल) रुग्णसेवेत संपूर्ण राज्यात चौथा क्रमांक मिळविला आहे. आरोग्य सेवेचा दर्जा सुधारुन उत्कृष्ट सेवा मिळत असल्याने, ‘सिव्हिल’मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे साडेसहा लाख रुग्णांनी उपचार घेतले आहेत. याबद्दल सिव्हिल प्रशासनाने केक कापून आनंदोत्सव साजरा केला.
सांगली, मिरजेत शासकीय रुग्णालयात बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागात उपचार घेणाºया रुग्णांच्या संख्येने सलग दुसºयांदा सहा लाखाचा आकडा पार केला आहे. ‘सिव्हिल’ प्रशासनाने सातत्याने वैद्यकीय सेवेचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न केले. राज्यात जे. जे. रुग्णालय मुंबई (चार रुग्णालये), ससून सर्वोपचार रुग्णालय (पुणे) व इंदिरा गांधी रुग्णालय (नागपूर) यांचा रुग्णसेवेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आला आहे. त्यानंतर सांगली ‘सिव्हिल’ने चौथा क्रमांक मिळविला. जिल्ह्याची २८ लाख लोकसंख्या आहे. लोकसंख्येचा विचार केला, तर अन्य शहरांच्या तुलनेत सांगलीचा तसा प्रथम क्रमांकच लागतो. अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक व कर्मचाºयांच्या मेहनतीमुळे रुग्णसेवेचा दर्जा सुधारला गेला. याचा समाजात चांगला संदेश गेल्याने, ‘सिव्हिल’कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. सिव्हिलबद्दल एकप्रकारे आधार निर्माण झाल्यानेच, उपचार घेणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.
महिलांच्या प्रसुतीचा खासगी रुग्णालयातील दर परवडत नसल्याने, येथे प्रसुतीसाठी दाखल होणाºया महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वर्षभरात याठिकाणी जवळपास दहा हजाराच्या घरात महिला प्रसुतीसाठी दाखल होत आहेत.
क्ष-किरण तपासणी, डायलिसीस, एमआरआय या तपासण्यांचा दरही बाहेर खूप मोठा आहे. गरिबांना तो परवडतही नाही. सिव्हिलमुळे रुग्णांना अल्पखर्चामध्ये या तपासण्या करता आल्या. या तपासण्या करण्यामध्ये ४० टक्के रुग्णांची संख्या वाढली आहे.
वसंतदादांच्या प्रतिमेचे पूजन
रुग्णसेवेत ‘सिव्हिल’चा चौथा क्रमांक आल्याबद्दल याचा प्रशासनाने केक कापून आनंदोत्सव साजरा केला. तत्पूर्वी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याहस्ते वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड, अधिसेविका समीता चव्हाण, प्रशासकीय अधिकारी मनोज दाभाडे, स्वच्छता निरीक्षक वसंतराव इंगळे आदी उपस्थित होते.