बालाजी चौकातील संकुलाबाबत न्यायालयात दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:25 AM2021-03-25T04:25:42+5:302021-03-25T04:25:42+5:30
आरती वळवडे म्हणाल्या, हरभट रोड येथील बालाजी चौकामध्ये एका बड्या बांधकाम व्यावसायिकांनी पाच मजली इमारत उभी केली आहे. या ...
आरती वळवडे म्हणाल्या, हरभट रोड येथील बालाजी चौकामध्ये एका बड्या बांधकाम व्यावसायिकांनी पाच मजली इमारत उभी केली आहे. या इमारतीसाठी त्यांनी रितसर महापालिकेकडे बांधकाम परवाना मागितला होता. बांधकामाचा नकाशा सादर करताना २२७ चौरस मीटरची तळमजल्यातील जागा पार्किंगसाठी सोडण्यात आली होती. यामध्ये दहा चारचाकी वाहने, वीस दुचाकी तर ५० सायकलींसाठी आरक्षित केली होती. शिवाय आणखी ६७१ चौरस मीटरची जागा जादा पार्किंगसाठी सोडली होती. या आधारेच महापालिकेने बांधकाम परवाना दिला होता. मात्र त्यानंतर बांधकामाच्या मूळ आराखड्यात व्यावसायिकाने खाडाखोड करून पार्किंगच्या जागेत गोदाम दाखविले व सद्य स्थितीला या जागेत २- कमर्शियल गाळे काढले आहेत. ही महापालिकेची फसवणूक असल्याचा आरोप वळवडे यांनी केला.
फिरोज पठाण म्हणाले, बाजारपेठेत सध्या पार्किंगचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे या इमारती बांधकाम विरोधात महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्यासह दहा ते बारा नगरसेवकांनी तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबुडकर व विद्यमान आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे तक्रार देखील केली होती. शिवाय सहाय्यक नगरचनाकार मुल्ला यांच्याकडे स्थळ पाहणीची मागणी केली होती. याची चौकशी झाली, स्थळ पाहणीही झाली. मात्र इमारत बांधकाम व्यावसायिकावर अद्याप कारवाई झाली नाही. इमारत पूर्णत्वाचा दाखला दिला आहे का? याची विचारणा केली असता अधिकारी उत्तर देत नाहीत. या इमारतीमधील पार्किंग गायब झाले आहे. या बरोबर फायर फायटर सिस्टिम, कॉमन टॉयलेट, अपंगासाठी रॅम्प आदी सुविधा देखील उपलब्ध नाहीत. या इमारतीचे तत्काळ बांधकाम थांबवून पार्किंगची व्यवस्था करावी व मूळ नकाशात खाडाखोड केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी दाखल करावी, या मागणीसाठी येथील जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.