वाळवा-शिराळ्यामध्ये दावे-प्रतिदाव्यांना ऊत-- : लोकसभा निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:21 AM2019-05-10T00:21:38+5:302019-05-10T00:24:33+5:30
हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाआघाडीतील ‘स्वाभिमानी’चे उमेदवार राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या उमेदवारीने रंगत वाढली होती. आता या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले
- अशोक पाटील ।
इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाआघाडीतील ‘स्वाभिमानी’चे उमेदवार राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या उमेदवारीने रंगत वाढली होती. आता या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.
वाळवा-शिराळ्यात स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचे प्रमुख कार्यकर्ते असलेल्या सयाजी मोरे, भागवत जाधव यांनी, शेट्टी किमान लाखाहून अधिक मतांनी विजयी होतील, असा दावा केला आहे. दुसरीकडे महायुतीच्या बाजूने दावा करताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दोघांचा दावा खोडून काढत, धैर्यशील माने किमान ७५ हजार मतांनी विजयी होतील, असे सांगितले.
खोत यांच्याकडे मंत्रीपद असले तरी, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा अभाव आहे. त्यांनी शिवसेनेचे आनंदराव पवार आणि भाजपचे विक्रम पाटील यांची मदत घेतली आहे. भाजपमध्ये दुफळी असून विक्रम पाटील व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात मतभिन्नता आहे. मात्र त्या दोघांंनीही माने हेच विजयी होतील, असे सांगितले आहे. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी जरी माने यांच्या विजयाचा दावा केला असला तरी, त्यामध्ये ठोसपणा दिसून येत नाही. महाडिक व हुतात्मा गटाचीही भूमिका तशीच आहे. त्यांच्यातील काही कार्यकर्ते आणि एकाच घरातील दोन नेते शेट्टी आणि माने या दोघांच्याही विजयाचा दावा करत आहेत.
ज्यांनी खासदार शेट्टींच्या फंडातून स्वत:च्या मिलसमोरील रस्ता करुन घेतला, त्या पवार बंधूंची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. हे काँग्रेसचे पाईक म्हणवून घेत असले तरी, शेट्टींच्या प्रचारात ते कोठेही दिसले नाहीत.
वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात आ. जयंत पाटील हे राजू शेट्टी यांना चांगले मताधिक्य मिळवून देतील, असा विश्वास पहिल्यापासूनच व्यक्त होत होता. परंतु मतदानानंतर मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, ५०:५० टक्के मतदान होईल, असे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते बोलू लागले आहेत.
पैजा लागल्या : चर्चा रंगली
आमदार जयंत पाटील यांना विधानसभेचे वेध लागले असून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे, तर खासदार राजू शेट्टी हे मतदार संघात भेटीगाठी घेऊन आभार मानत आहेत. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्यातील लोकसभा निवडणुकीच्या संघर्षाचा निकाल काय लागणार, याची गोळाबेरीज करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या रकमेच्या पैजा लागल्या आहेत. त्यामुळे शेट्टी की माने, यापैकी कोण निवडून येणार, याची चर्चा रंगली आहे.