प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांचा सत्कारातून निषेध, अधिकाऱ्यांनी विधानावरुन घेतला यु टर्न
By शीतल पाटील | Published: January 17, 2023 09:25 PM2023-01-17T21:25:43+5:302023-01-17T21:27:47+5:30
थंडीमुळे नदीतील मासे मेले, हे बोललोच नाही!
शीतल पाटील
सांगली : बहे-बोरगाव येथे मृत माशांबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने थंडीचे कारण दिले होते. त्याचा निषेध करण्यासाठी कृष्णा महापूर समिती व आंदोलन अंकुशचे पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांचा सत्कार करण्याचा निर्धार करीत कार्यालय गाठले. पण त्यांनी मी असे बोललोच नाही. केवळ शक्यता व्यक्त केली होती. माझ्या विधानाचा विपर्यास्त करण्यात आल्याचे सांगून वेळ मारून नेली.
काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीतील मासे मृत झाले होते. कडाक्याच्या थंडीमुळे मासे मृत झाल्याचे वक्तव्य प्रदूषण मंडळाकडून करण्यात आले. यावर कृष्णा महापूर समिती व शिरोळच्या आंदोलन अंकुशचे पदाधिकारी आक्रमक झाले. मंगळवारी त्यांनी सांगलीतील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय गाठले. मासे कशामुळे मृत झाले? त्यांचे प्रयोगशाळेत चाचणी केली आहे का, अशी विचारणा केली.
त्यावर अवताडे यांनी हवामानातील बदल, रासायनिक दूषित पाणी, ऑक्सिजनचे कमी प्रमाण अशा कारणामुळे मासे मृत होऊ शकतात. काहींनी माझ्या शब्दाचा विपर्यास केला आणि थंडीने मासे मृत्यू झाले असे वृत्त पसरविले, असे स्पष्टीकरण दिले. यावर कार्यकर्त्यांनी नदीचे प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल केला.
पाण्याचे नमुने आणि माशांचे अवयव घेतलेले आहेत. तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित कंपनी, कारखान्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही अवताडे यांनी दिले. संबंधित कारखान्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनाजी चिडमुंगे यांनी दिला. यावेळी सर्जेराव पाटील, दीपक पाटील, संजय कोरे, संभाजी शिंदे, भूषण गंगावणे, आनंद भातमारे, सचिन सगरे, अमर माने, रियाज मुल्ला उपस्थित होते.