मिरजेत ठाकरे, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांत हाणामारी
By शरद जाधव | Published: January 1, 2024 08:11 PM2024-01-01T20:11:24+5:302024-01-01T20:11:35+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या आदेशानेच कार्यालय हटविल्याचा आरोप ठाकरे गटाने केला.
मिरज : मिरजेत शिवसेनेच्या ठाकरे गटाने उभारलेल्या कार्यालयावरून शिवसेनेच्या दोन गटांत जोरदार वादावादी झाली. शिंदे व ठाकरे गटांच्या शहरप्रमुखांत हाणामारी झाली. त्यानंतर महापालिकेने कार्यालयाचे अतिक्रमण काढून टाकले. यावेळी पोलिस आणि शिवसैनिकांत जोरदार धक्काबुक्की झाली. अतिक्रमण हटविण्यास विरोध करणारे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांना पोलिसांनी फरफटत गाडीत घातले. जेसीबीच्या मदतीने पत्र्याचे खोके जमीनदोस्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या आदेशानेच कार्यालय हटविल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. ठाकरे गटाने किल्ला भागात संपर्क कार्यालय म्हणून खोके बसविले होते. पण ते अतिक्रमण असल्याच्या तक्रारीनंतर शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आले. शिंदे व ठाकरे गटांच्या शहरप्रमुखांत हाणामारी झाली. परस्परांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या कार्यालयाचे काम बंद पाडले.
सेतू कार्यालयाजवळ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयासाठी खोके बसविण्यास सुरुवात केली असता शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे तक्रार केली. तिची दखल घेत अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे पथक आले. मैगुरे यांच्याशी त्यांची वादावादी झाली. मैंगुरे यांनी ही जागा शिवसेनेच्या मालकीची असून अतिक्रमण नसल्याचा पवित्र घेतला. दरम्यान, शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत तेथे आले. आमची शिवसेना खरी असून महापालिकेने अतिक्रमण त्वरित हटवावे अशी मागणी केली. त्यामुळे मैगुरे व राजपूत यांच्यात बाचाबाची, हमरीतुमरी झाली. शिवीगाळही केली. खोके हटविले जात नसल्याने पाहून राजपूत गटाने आक्रमक पवित्रा घेतला, त्याचे पर्यवसान मैगुरे व रजपूत यांच्या हाणामारीत झाले. पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न केला.
ठाकरे गट खोके हटविण्यास तयार नसल्याने तब्बल चार तास महापालिकेचे पथक थांबून होते. उपायुक्त स्मृती पाटील व पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. अखेर पाच वाजता बंदोबस्तात महापालिकेने अतिक्रमण हटविले. यावेळीही शिवसैनिकांच्या विरोधामुळे पोलिसांसोबत झटापट झाली. खोके काढण्यास विरोध करीत जमिनीवर झोपलेल्या मैगुरे यांना पोलिसांनी फरफटत नेऊन गाडीत घातले. महिला शिवसैनिकांही ताब्यात घेतले. त्यानंतर खोके जमीनदोस्त करण्यात आले.