सांगलीत भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांत हाणामारी, निविदेवरून वाद
By शीतल पाटील | Published: January 20, 2023 08:38 PM2023-01-20T20:38:41+5:302023-01-20T20:38:47+5:30
पोलिसांची मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात
सांगली: महापालिकेच्या आवारात शुक्रवारी भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांत हाणामारी झाली. स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी व भाजपचे शहर सचिव अतुल माने यांच्यातील मारामारीनंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत माने यांना पोलिस ठाण्यात आणले. नाल्याच्या निविदेतून वाद होऊन मारामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचे वृत्त पसरताच सूर्यवंशी समर्थकांनी महापालिकेत गर्दी केली होती, तर पोलिस ठाण्यासमोर माने समर्थक जमा झाले होते. त्यामुळे परिसरात तणाव होता. याबाबत दोघांकडूनही पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही.
महापालिकेने चैत्रबन ते आरवाडे पार्क हा नाला बंदिस्त करण्यासाठी दहा कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे. माने यांच्याशी संबंधित एकाने निविदा भरली होती. या निविदेवरून सूर्यवंशी व माने यांच्यात वाद सुरू होता. शुक्रवारी स्थायी समितीची सभा होती. यावेळी माने महापालिकेच्या आवारात आले होते. सभेचे कामकाज संपल्यानंतर सूर्यवंशी व माने यांच्यात महापालिकेच्या आवारातील पार्किंगच्या जागेत वाद होऊन मारामारी सुरू झाली. काही नगरसेवकांसह उपस्थित कर्मचारी, नागरिकांनी दोघांतील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. गर्दी पाहून शहर पोलिस ठाण्याकडील कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या आवारात धाव घेतली. पोलिसांनी माने यांना ठाण्यात आणले.
या मारामारीचे वृत्त पसरताच सूर्यवंशी समर्थकांनी महापालिका मुख्यालयासमोर गर्दी केली होती, तर समोरच शहर पोलिस ठाण्याच्या आवारात माने समर्थक जमा झाले होते. दोघांनी बाजूंनी समर्थकांची गर्दी झाल्याने काहीकाळ तणावाची स्थिती होती. पोलिसांनी तणाव निवळेपर्यंत माने यांना पोलिस ठाण्यातच बसून ठेवले होते. सुमारे तासभराच्या गोंधळानंतर तणाव निवळला.
भाजप नेत्यांची फोनाफोनी
भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांत मारामारी झाल्याचे वृत्त पसरताच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने दखल घेत सावरासावर सुरू केली. दोन्ही बाजूंनी पोलिसांत तक्रार दाखल होऊ नये, यासाठी फोनाफोनी करण्यात आली. भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्यानेही दोघांशी संपर्क साधला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या मारामारीची पोलिसांत नोंद झाली नव्हती.
महापालिकेच्या आवारात धीरज सूर्यवंशी व अतुल माने यांच्या किरकोळ कारणावरून वादावादी झाली. दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावून प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. - अभिजित देशमुख, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे