Sangli News: मिरवणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी; १५ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 12:40 PM2023-05-06T12:40:19+5:302023-05-06T12:40:36+5:30
गेल्या काही दिवसांपासून दोन गटात वाद धुमसत होता
दरीबडची : अक्कळवाडी (ता. जत) येथे मिरवणुकीच्या वादातून दोन गटात झालेल्या जोरदार हाणामारीत १५ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजता घडली. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. संशयितांमध्ये सरपंच, उपसरपंचासह दोन्ही गटाच्या ४४ व अनोळखी ७० जणांवर गुन्हा दाखल आहे.
अक्कळवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून दोन गटात वाद धुमसत होता. गुरुवारी रात्री गावात मिरवणूक होती. यावेळी दोन्ही गटात पुन्हा वादाला तोंड फुटले आणि तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गट लोखंडी गज, काठ्या, दगड, चाकू अशी हत्यारे घेऊन एकमेकांवर धावून गेले.
हाणामारीत नजीरसाब बंदगीसाब इनामदार, लतीफ मेहबूब इनामदार, सद्दाम मकबूल इनामदार, जब्बार मकबूल इनामदार, मेहबूब मोदीनसाब बालगाव, झुलेखा रजाक पटेल, सैनाज शब्बीर मुल्ला, बियामा मेहबूब इनामदार, रविकुमार मलकाप्पा हलसंगी, सुनील सोनगी, अनिल सोनगी, मंजुनाथ मलकाप्पा मलाबादी, श्रीशैल बसगोंड मलाबादी, काशिनाथ बसगोंड मलाबादी, गजानन रमेश मलाबादी हे जखमी झाले. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नजीरसाब बंदगीसाब इनामदार यांच्या फिर्यादीवरून सरपंच शिवानंद चन्नाप्पा मलाबादी, उपसरपंच सुनील नागाप्पा शेजाळे, रेवणसिद्ध शिवराया पाटील, श्रीशैल बसाप्पा मलाबादी, विश्वनाथ मलकाप्पा मलाबादी यांच्यासह २५ जण तसेच अन्य ४० अनोळखींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रविकुमार मलकाप्पा हलसंगी यांच्या फिर्यादीवरुन इस्ताक अली रसूलसाब बालगाव, सद्दाम मकबूल इनामदार, लतीब महेबूब इनामदार, रज्जाक हुसेनसाब बालगाव, पैगंबर मीरासाब बालगाव यांच्यासह १९ जण व अन्य ३० अनोळखींविरोधात उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गावात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून दंगल नियंत्रण पथकही तैनात आहे. जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश रामाघरे, कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, उमदी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक एस. एस. शिंदे, लक्ष्मण खरात हे रात्रीपासून तळ ठोकून होते. शुक्रवारी अतिरिक्त उपविभागीय अधिकारी आश्विनी शेंडगे यांनी गावात भेट देऊन बंदोबस्ताबाबत सूचना दिल्या.
गावच्या सीमेवर पोलिस बंदोबस्त
सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुका सुरू आहेत. अक्कळवाडी गाव कर्नाटक सीमेवर आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावच्या सीमेवर बॅरिकेड लावून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.