साखराळेत मतदानावेळी महायुती-आघाडीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी, दोन्ही गटांच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 12:09 PM2024-05-08T12:09:44+5:302024-05-08T12:11:46+5:30
जयंत पाटील यांच्या होमपीचवर वाद..
इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना बुथवर अपक्ष उमेदवाराची खोटी सही करून बोगस एजंट बनल्याच्या कारणातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी सकाळी बाचाबाची आणि दुपारी हाणामारी झाली. याबाबत मतदान केंद्रावरील पोलिस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून दोन्ही गटांच्या ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
सतीश आनंदा खोत (३२) या पोलिस शिपायांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप पाटोळे, ओंकार देशमुख, स्वप्नील लोहार, दत्तात्रय पाटील, रामराजे पाटील, प्रशांत पाटील, संतोष पाटील, प्रदीप बाबर (सर्व रा. साखराळे, ता. वाळवा) अशा दोन्ही गटांतील आठ कार्यकर्त्यांविरुद्ध भादंवि कलम १६०,१८६,१८८ आणि ३७ (१) (३)/१३५ नुसार गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास मतदान केंद्र क्रमांक ६२ आणि ६३ च्या परिसरात घडला.
याबाबतची माहिती अशी, साखराळे येथे मतदान प्रक्रिया सुरू असताना संदीप पाटोळे यांनी मतदान केंद्र क्र.६३ चे केंद्राध्यक्ष शंकर यशवंत होनमाने यांच्याकडे अपक्ष उमेदवार रामचंद्र गोविंद सांळुखे यांच्या सहीने प्रतिनिधीकरिता दिलेल्या फॉर्मवरची सही खोटी करून संतोष राजेंद्र पाटील व संतोष विष्णू पाटील (दोन्ही रा. साखराळे) हे मतदान प्रतिनिधी म्हणून मतदान केंद्रावर काम करीत आहेत अशी तक्रार केल्यावर या वादाला तोंड फुटले. त्यातून दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकास भिडले व तिथे हाणामारी झाली.
पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत एकमेकांशी वाद घालत धक्काबुक्की केली असा ठपका ठेवत सरकारतर्फे हा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे अधिक तपास करत आहेत.
जयंत पाटील यांच्या होमपीचवर वाद..
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे आपल्या दोन्ही मुलांसमवेत बुद्धविहार येथील केंद्रावर मतदान करून गेले होते. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. साखराळेच्या गाव हद्दीतच कारखाना असल्याने येथे त्यांच्या गटाचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. त्यामुळे येथे पारंपरिक विरोधक आणि नवयुवक अशी फळी तयार झाली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक निवडणूक इर्षेने लढवली जाते. त्यातूनच आज पुन्हा बोगस एजंटच्या निमित्ताने दोन्ही गट एकमेकाला भिडले.