जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग येत्या सोमवारपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 02:08 PM2022-01-08T14:08:21+5:302022-01-08T14:08:54+5:30
नववी व दहावीचे वर्ग मात्र सुरू राहणार आहेत.
सांगली : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पहिली ते आठवीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केला. एका कार्यक्रमात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यानंतर रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले. त्यानुसार, सोमवारपासून (दि.१०) वर्ग बंद राहणार आहेत.
जिल्ह्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करत असल्याचे पालकमंत्री पाटील म्हणाले. सध्या १५ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरू आहे, त्यामुळे नववी व दहावीचे वर्ग मात्र सुरू राहणार आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी सकाळी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शाळा बंद करण्याबाबत त्यांच्या भूमिका जाणून घेतल्या. सायंकाळी वर्ग बंदचे आदेश जारी केले. हे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्याबाबत जिल्हा परिषदेच्या व महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांना त्यांच्या स्तरावरून स्वतंत्र आदेश देण्यास संगितले आहे.
उर्वरित विद्यार्थ्यांचे लसीकरण समन्वयाने करून घ्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. जिल्हा परिषद व महापालिकेच्या शिक्षण विभागांनी सुरू राहणाऱ्या वर्गांसाठी कोरोना प्रतिबंधक निर्देशांची अंमलबजावणी करायची आहे.