विवेकस्पर्शी चळवळीचा निर्मळ कार्यकर्ता

By admin | Published: April 28, 2016 11:54 PM2016-04-28T23:54:40+5:302016-04-29T00:22:59+5:30

निळूभाऊ फुल्यांनी सामाजिक कृतज्ञता निधीतून राहुलला वेतन मिळावं यासाठी स्वत: पत्र लिहिलं. डॉ. श्रीराम लागू यांच्या संकल्पनेतून सामाजिक कृतज्ञता निधीची कल्पना पुढे आली आणि

Clean Workers of the Paranormal Movement | विवेकस्पर्शी चळवळीचा निर्मळ कार्यकर्ता

विवेकस्पर्शी चळवळीचा निर्मळ कार्यकर्ता

Next

दाभोलकरांच्या विवेकवादी विचारस्पर्शाने प्रेरित झालेला राहुल तासगाव तालुक्यातील बलगवडेचा. आई-वडील शेतमजूर. घरात आंबेडकरी विचारांचा पुरोगामी वारसा होता. राहुल दहावीत असताना विधानसभेची निवडणूक होती. त्यात राहुल सवंगड्यांसोबत आर. आर. पाटील आबांच्या प्रचारात सहभागी झाला होता. एक दिवस सभा संपल्यावर आबांनी झाडाखाली जेवण मागवले. तिथेच त्यांनी भास्कर सदाकळे यांना, ‘तुमचं ते अंधश्रध्दा निर्मूलनाचं आख्यान लावा’, असं सांगितले. मग सदाकळेंनी लोकांचं प्रबोधन आणि मनोरंजन केलं. राहुलनं तिथंच अंधश्रध्दा निर्मूलनासाठीच काम करायचं निश्चित केलं.
दहावीनंतर आयटीआयला तासगावात प्रवेश घेतला. तिथं प्रा. बाबूराव गुरव, विजय कराडे, प्रताप घाडगे यांचा चळवळीच्या माध्यमातून संबंध आला. आयटीआयला तो जिल्ह्यात पहिला आला. मुलाखतीशिवायच किर्लोस्कर कंपनीत नोकरी मिळाली. पहिला पगार त्यानं अंधश्रध्दा निर्मूलन समितीला देणगी म्हणून देऊ केला. सगळ्यांनाच अप्रूप वाटलं. १९९९ मध्ये त्यानं ‘लोकमत’चा प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेला सुरुवात केली. यातून शोधपत्रकारिता सुरू झाली. त्याची गती बघून डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राची जबाबदारी घेण्याविषयी सुचवलं. दाभोलकरांचा साधेपणा आणि विचारांनी प्रभावित झालेल्या राहुलसाठी ही जबाबदारी म्हणजे समस्त चळवळीने दाखविलेला गाढा विश्वास होता. गेली २० वर्षे वार्तापत्राचा प्रकाशक, व्यवस्थापकीय संपादक आणि शोधपत्रकारिता करणारा परखड लेखक अशा विविध भूमिकांतून त्याने हा विश्वास सार्थ ठरवला आहे.
त्याची तळमळ, कामाची पध्दत बघून कुणासाठीही शिफारस न करणाऱ्या निळूभाऊ फुल्यांनी सामाजिक कृतज्ञता निधीतून राहुलला वेतन मिळावं यासाठी स्वत: पत्र लिहिलं. डॉ. श्रीराम लागू यांच्या संकल्पनेतून सामाजिक कृतज्ञता निधीची कल्पना पुढे आली आणि त्यासाठी डॉ. बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर, निळूभाऊंनी एक कोटीचा निधी उभा केला. राहुल ‘अंनिस’चा फुलटाईम कार्यकर्ता झाला, तेव्हा त्याच्या आईला शेतात भांगलण्यासाठी ३० रूपये मजुरी मिळत होती, पण आई-वडिलांनी व भावाने त्याच्या भूमिकेला व कार्याला नेहमीच पाठिंबा दिला. ‘अंनिस’च्या कायदेशीर सल्ल्याचं काम दिवंगत अ‍ॅड. दत्ताजीराव माने स्वखर्चानं करायचे. दत्ताजीरावांचे जीवनचरित्र लिहिण्याची जबाबदारी राहुलवर आली. ‘अंनिस’चे संपादक प्रा. प. रा. आर्डे, कुमार मंडपे यांच्या जीवनकार्याच्या पुस्तिकाही त्याने लिहिल्या. ‘जोडीदाराची निवड व आंतरजातीय विवाह’ या पुस्तकाचे संपादन त्याने केले आहे. धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या बुवाबाजीवर सडेतोड लिखाण केले आहे. आसाममधील चेटकिणी समजून महिलांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारांवर त्याने तेथे जाऊन शोधक वृत्तीने लिहिले आहे. जातपंचायती आणि त्यातून घडणाऱ्या अन्यायाविरोधात संशोधनपर लेखन केले आहे. नागनाथअण्णांच्या पाणी चळवळीतही कार्यकर्ता म्हणून तो कार्यरत राहिला. कॉ. गोविंद पानसरेंच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या राजर्षी शाहू आंतरजातीय विवाह सहाय्यता केंद्राचा सचिव म्हणून तो कार्यरत आहे. ‘अंनिस’ने गतवर्षी नाशिक येथे ‘उत्कृष्ट युवा कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन राहुलचा गौरव केला.
- महेश कराडकर


चमत्कार-जादुटोणा करणाऱ्यांचे, गंडेदोरे-अंगारे-धुपारे देऊन लोकांना फसवणाऱ्यांचे पितळ विज्ञानाच्या कसोटीवर उघडे पाडण्याची विवेकवादी चळवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून राबवली जात आहे. एकीकडे याला विरोध होत असताना, अंनिसचे कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. या चळवळीच्या ‘अंधश्रध्दा निर्मूलन वार्ता’ या मुखपत्राला आता २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त दुसरे अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलन १४ व १५ मेरोजी सांगलीत होणार आहे. या संमेलन समितीचा सचिव आणि गेली वीस वर्षे ‘अंनिवा’चा व्यवस्थापकीय संपादक व प्रकाशक म्हणून काम करणाऱ्या राहुल थोरात या कार्यकर्त्याचा जीवनपट संघर्षाने भरला आहे.

Web Title: Clean Workers of the Paranormal Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.