बहे येथील रामलिंग बेटावर वन विभागाची स्वच्छता मोहीम : कृष्णा नदीने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:29 PM2018-05-30T23:29:28+5:302018-05-30T23:29:28+5:30
शिरटे : बहे (ता. वाळवा) येथील रामलिंग बेटावर सामाजिक वनीकरण व वनक्षेत्रपाल यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे कृष्णा नदीने मोकळा श्वास घेतला आहे. पूल ते राममंदिरपर्यंतचा रस्ता, मंदिर परिसर व नदीच्या दुतर्फा असणारा प्लॅस्टिक, कचरा बाहेर काढण्यात आला. युवा नेते प्रतीक पाटील यांनीही सहकाऱ्यांसह स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
इस्लामपूर परिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल प्रियांका दळवी यांनी कृष्णाकाठावरील स्वच्छतेची मोहीम राबविण्याबाबत राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील, सरपंच छायादेवी पाटील, उपसरपंच मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. पर्यटन व धार्मिक वारसा जपणाºया रामलिंग बेटाजवळ स्वच्छता करण्याचे निश्चित करण्यात आले.
पहिल्यादिवशी विभागीय वन अधिकारी व्ही. डी. जवळेकर, वन क्षेत्रपाल प्रियांका दळवी, सुप्रिया शिरगावे, वनपाल वसंत चव्हाण, सुप्रिया मदने यांच्या नेतृत्वाखाली सायकल फेरी काढून जनजागृती करण्यात आली.
या हाकेला ओ देऊन बहे ग्रामपंचायत, ग्रामस्थ, विविध संस्था यांच्यासह इस्लामपूरच्या महाराष्ट्र अॅकॅडमीचे संचालक अस्लम शिकलगार व विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
रामलिंग बेट व कृष्णा नदी स्वच्छतेच्या वनीकरण विभागाच्या मोहिमेला प्रतिसाद देत दुसºया दिवशी युवा नेते प्रतीक जयंत पाटील, तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्राम पाटील, माजी अध्यक्ष संजय पाटील, ‘राजारामबापू’चे संचालक विठ्ठलराव पाटील, सुवर्णाताई पाटील, सरपंच छायाताई पाटील, उपसरपंच मनोज पाटील यांनीही मोहिमेत सहभाग घेतला.
बहे (ता. वाळवा) वन विभागाच्यावतीने दिलेल्या कचराकुंड्या प्रतीक पाटील यांच्याहस्ते छायादेवी पाटील व मनोज पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी सुप्रिया शिरगावे, संजय पाटील, प्रियांका दळवी उपस्थित होते.