फळमार्केटमध्ये स्वच्छतेचा बोजवारा

By admin | Published: November 17, 2015 11:40 PM2015-11-17T23:40:26+5:302015-11-18T00:14:22+5:30

सांगलीत सुविधांचा अभाव : बाहेरून ‘झकास’ आणि आतून मात्र ‘भकास’

Cleanliness in the fruit market | फळमार्केटमध्ये स्वच्छतेचा बोजवारा

फळमार्केटमध्ये स्वच्छतेचा बोजवारा

Next

सांगली : वर्षाला पाच कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मार्केटच्या परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य व त्याची विल्हेवाट न लावल्याने बकालपणा आला आहे. बाहेरून ‘झकास’ दिसणारे मार्केट आतमधून ‘भकास’ झाल्याने व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कोल्हापूर रस्त्यावर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विष्णुअण्णा पाटील फळ मार्केट आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक बाजारपेठेत फळांची आवक-जावक होण्यासाठी या फळ मार्केटला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नेहमीच व्यापाऱ्यांसह शेतकरी व वाहनांची मोठी गर्दी मार्केटमध्ये दिसून येते. व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये फळांची खरेदी-विक्री व्यवहार होत असतात, तर दक्षिणेकडील शेडमध्ये कांद्यासह इतर फळांची आवक होते. या शेड परिसरात व्यापाऱ्यांनी स्वत: काही प्रमाणात स्वच्छता ठेवली असली तरी फळांची आवरणे आणि पाल्यामुळे बाहेर अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे मधोमध असलेला कचरा जाळण्यात येत असला तरी परिसरात असणारी व्यापाऱ्यांची दुकाने लक्षात घेता, त्या कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट लावण्याची मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे.
मार्केटच्या पूर्वेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व कचऱ्यातून खताची निर्मिती करण्याच्या हेतूने पत्र्याच्या शेडमध्ये गांडूळ खताचे दोन प्लांट तयार करण्यात आले असले तरी ते बंद अवस्थेत आहेत. त्या शेजारीच मार्केटमधील कुजलेली खराब फळे व त्याची आवरण व फळांच्या पेटीमध्ये वापरण्यात येणाऱ्या गवताचा ढीग लागला आहे.
कुजलेली फळे तेथेच टाकून देण्यात आल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे. पाऊस झाल्यानंतर याचा त्रास होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यासह कर्नाटकातील अनेक व्यापारी आणि शेतकऱ्यांचा फळमार्केटमध्ये राबता असताना, त्यांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह नसल्याने अडचण निर्माण होत आहे. स्वच्छतागृह नसल्यानेही परिसरातील घाणीत व दुर्गंधीत वाढच होत आहे. बाजार समितीला दरवर्षी कोटींचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळमार्केटमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)

गांडूळ खताचा प्रकल्प धूळ खात...
फळमार्केटमध्ये पूर्वेला कचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती करण्याचा छोटा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. मात्र, देखभालीअभावी तो बंद आहे. मार्केटमध्ये निर्माण होणारा कचरा व टाकाऊ फळांची संख्या लक्षात घेता बाजार समितीच्या प्रशासनाने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे आवश्यक आहे.

Web Title: Cleanliness in the fruit market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.