रोजगार बुडवून कचरा वेचक महिलांकडून स्वच्छता...
By admin | Published: May 7, 2017 11:52 PM2017-05-07T23:52:20+5:302017-05-07T23:52:20+5:30
‘आस्था’चा उपक्रम : महिलांचे कौतुक, मोती तळ्याची श्वेता सिंघल यांच्याकडून पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : स्वत: घाणीत जाऊन कचरा डेपो स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कचरा वेचक महिलांनी रविवारी पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला. दिवसाचा रोजगार बुडवून सुमारे दहा ते बारा कचरा वेचक महिलांनी शहरातील मोती तळ्याची स्वच्छता केली. त्यांच्या या कामाचे कौतुक जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी त्यांना भेटून केले.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील आस्था सामाजिक संस्था व सर्व कचरा वेचक श्रमिक संघ यांच्या वतीने सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या ऐतिहासिक मोती तळे गेल्या काही दिवसांपासून शेवाळे होते. परिसरातील नागरिकांनी या तळ्यात घाण टाकल्याने तळ्यावर शेवाळे चढले होते. हे शेवाळे इतके वाढले होते की, त्याखाली पाणी असल्याच्या खुणाच नष्ट झाल्या होत्या. साताऱ्यातील अनेकांनी या तळ्याची दुर्दशा पाहून खिन्न मन केले. पण त्यापुढे काही कोणाची पावले उठली नाहीत. पण शहराबाहेर राहणाऱ्या आणि अभावानेच या तळ्याच्या आसपास फिरकणाऱ्या या महिलांनी शहराप्रती आपले कर्तव्य दाखवत मोती तळ्याची स्वच्छता केली. याची पाहणी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण हेही उपस्थित होते. ‘आस्था’ संस्थेचे काम आदर्शवत असून, आपण व कचरा वेचक श्रमिक संघास यासारख्या उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य शासनाच्या वतीने करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मोती तळे परिसराची स्वच्छता मोहीम सुरू होती. यामध्ये तळ्यातील प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा गोळा केला. प्राथमिक स्वरुपातील कचरा काढला असून, उर्वरित टप्प्यातील कामही करून संपूर्ण तळे कचरा मुक्त करण्याचा संकल्प असल्याची माहिती ‘आस्था’चे विजयकुमार निंबाळकर यांनी दिली.
या उपक्रमास सातारा नगरपरिषदेचे बांधकाम सभापती किशोर शिंदे यांनीही भेट देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्युन्सिपल कर्मचारी संघटनेचे शिवाजी पवार, ‘आस्था’चे सुजीत शेडगे, जनार्दन निपाणे, हेमंत दरेकर, सुनील भोसले, गोरख निपाणे, मंगेश लावंड, मनोज निपाणे, सुधीर शेडगे, विशाल दाभाडे, कन्हैयालाल राजपुरोहित, कचरा वेचक संघाचे अध्यक्ष प्रकाश भिसे, कचरा वेचक संघाच्या महिला सदस्य उपस्थित होते.
मोती तळ्यात नारळांचा
खच
घरातील विविध धार्मिक कार्यक्रम उरकल्यानंतर निर्माल्य ‘वाहत्या पाण्यात’ टाका असे अनेक पूजा करणारे गुरुजी सांगतात. सातारा शहरात राहणाऱ्यांना ओढ्याशिवाय वाहते पाणी मिळत नाही आणि ओढ्यात निर्माल्य टाकणं म्हणजे पाप असे समजून सोयीस्करपणे ‘साठलेल्या पाण्यात’ अर्थात बंदिस्त तलावात निर्माल्य टाकतात.
फक्त निर्माल्य पाण्यात टाकले तर किंबहुना त्याचे विघटन पाण्यात होण्याची शक्यता असते. मात्र, प्लास्टिकच्या पिशवीसह टाकलेल्या निर्माल्याचे विघटन होणे अवघडच! त्यातच काही महाभागांनी तर चक्क अख्खे नारळचं या पाण्यात टाकले आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या आणि नारळांचा खच या तलावातून काढण्यात आला.