वसंतदादा स्मारकाचे स्वच्छता कामगार बिनपगारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:55 PM2018-10-01T23:55:37+5:302018-10-01T23:55:41+5:30
सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षातच स्मारक परिसराची स्वच्छता करणाऱ्या कंत्राटी कर्मचाºयांना महापालिकेकडून गेल्या सात महिन्यांपासून पगारच दिला गेलेला नाही. काम करा, वेतनाचे नंतर पाहू, या आश्वासनावर बोळवण करून प्रशासनाची फाईल आयुक्तांच्या टेबलवर पडून आहे. त्यात आता या कंत्राटी कामगारांनीही काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने स्मारकाच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
वसंतदादा स्मारक परिसर स्वच्छतेसाठी महापालिकेने वर्षभरापूर्वी ठेकेदार नियुक्त केला होता. या ठेकेदाराने वर्षभर काम पाहिले. सात-आठ महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदाराचा करार संपल्यानंतर त्याने यापुढे काम करू शकणार नसल्याचे लेखी पत्र प्रशासनाला दिले होते. ठेकेदाराने काम सोडले तरी, त्याच्याकडील कंत्राटी कामगार मात्र स्मारकाची स्वच्छता करीत होते.
उद्यान विभागाने या कामगारांना वेतन देण्याची हमी दिली होती. तशी फाईलही आयुक्तांना सादर केली. एप्रिल २०१८ पासून ठेकेदाराकडील हे कर्मचारी काम करीत आहेत. मात्र प्रशासनाच्या निर्णय घेण्याबाबतच्या अकार्यतत्परतेमुळे या कर्मचाºयांना पगार नाहीत. ते विनावेतन काम करीत आहेत. हे काम दुसºया ठेकेदाराकडेही सोपवले गेलेले नाही. एका ठेकेदाराने काम सोडले असेल तर, दुसरा ठेकेदार नियुक्त करण्यासाठी दिरंगाई कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले, वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. अशावेळी प्रशासनाने स्मारकाच्या स्वच्छतेचे काम करणाºया कर्मचाºयांबाबतीत इतकी उदासीनता दाखवणे, हे दुर्देवी आहे. या कर्मचाºयांचे थकीत वेतन तातडीने द्यावे, अशी मागणी केली आहे.