Sangli News: वैभव पाटलांनी कोंड बदललं; खासदार समर्थकांचं कोडं सुटलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 05:34 PM2023-09-13T17:34:41+5:302023-09-13T17:36:21+5:30

राष्ट्रवादीची कोंडी कायम

Clear the way for supporters of MP Sanjay Patil to provide logistics to Vaibhav Patil on the floor of the Legislative Assembly | Sangli News: वैभव पाटलांनी कोंड बदललं; खासदार समर्थकांचं कोडं सुटलं

Sangli News: वैभव पाटलांनी कोंड बदललं; खासदार समर्थकांचं कोडं सुटलं

googlenewsNext

दत्ता पाटील

तासगाव : विट्यातील राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांनी शरद पवार गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार गटात प्रवेश केला. वैभव पाटलांनी कोंड बदलल्यामुळे, खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील विसापूर मंडलातील २१ गावांत खासदार समर्थकांचे कोडं सुटलं आहे. महायुतीतील विधानसभेचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र वैभव पाटील महायुतीत आल्यामुळे खासदार समर्थकांना विधानसभेच्या पटावर वैभव पाटलांना रसद देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट विसापूर मंडलातील २१ गावांत भाजपचे खासदार संजय पाटील आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांचेच गट आहेत. येथील ‘व्होट बँक’ नेहमीच निर्णायक राहिली. मात्र खानापूर तालुक्यातील नेत्यांना येथे स्वतःचा गट निर्माण करण्यात यश मिळालेले नाही. विसापूर मंडलाचे मतदान संजय पाटील आणि सुमनताई पाटील यांच्याच इशाऱ्यावरून होत असते.

अपवाद वगळता येथे खासदार गटाची साथ माजी आमदार सदाशिव पाटील यांना राहिली आहे. आमदार सुमनताई गटाचे झुकते माप आमदार अनिल बाबर यांच्याच पदरात पडले आहे. पक्षीय युती आणि आघाड्यांच्या त्रांगड्यातही पक्षादेश झुगारून कार्यकर्त्यांनी स्वतःच्या सोयीनुसार मतदान केले. विधानसभा निवडणुकीत तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीचा झेंडा असणारे कार्यकर्ते, खानापूरमध्ये शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेत होते. तर तासगाव तालुक्यात भाजपचा झेंडा खांद्यावर असणारे कार्यकर्ते, खानापुरात राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेत होते. या परिस्थितीत तासगावच्या नेत्यांची कोंडी झाल्याचे चित्र अनेकदा दिसले.

गत निवडणुकीत, अनिल बाबर हे भाजप-सेना युतीकडून तर सदाशिव पाटील राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढले. मात्र विसापूर गटात अपवाद वगळता, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षादेश झुगारून काम केले होते. बदलत्या समीकरणात वैभव पाटील, शरद पवार गटातून फारकत घेत अजित पवार गटात पर्यायाने महायुतीत सहभागी झालेत. विधानसभेच्या पटावर वैभव पाटील यांच्यासोबत राहण्यासाठी खासदार गटाचा मार्ग यानिमित्ताने मोकळा झाल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीची कोंडी कायम

विसापूर मंडलामधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेचे आमदार बाबर यांच्यासोबत सदैव राहिले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही विसापूर सर्कलमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबर यांनाच रसद देतील, असे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादी समर्थकांची कोंडी मात्र कायम आहे.

Web Title: Clear the way for supporters of MP Sanjay Patil to provide logistics to Vaibhav Patil on the floor of the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.