कासेगावला अखेर स्वच्छ पाणी पुरवठा
By admin | Published: December 10, 2014 10:48 PM2014-12-10T22:48:48+5:302014-12-10T23:46:08+5:30
‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश : पाच दिवसांपासून दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण
प्रताप बडेकर - कासेगाव येथील मातंग समाजातील ग्रामस्थांना गेल्या पाच दिवसांपासून अळीमिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. याबाबात ‘लोकमत’ने शेवटपर्यंत पाठपुरावा करून ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यास भाग पाडले. याबद्दल ग्रामस्थांतून ‘लोकमत’चे अभिनंदन होत असून, अभिनंदनाचे फलक गावातून फिरवले जात आहेत.
कासेगाव येथील मातंग समाजात गेल्या आठवड्यापासून दूषित व अळीमिश्रित पाणी पुरवठा सुरू होता. याबाबतची तक्रार ग्रामपंचायतीकडे देऊनही याकडे दुर्लक्ष केले होते. हे दूषित पाणी पिण्यात आल्याने ग्रामस्थांना जुलाब, उलट्या व ताप येणे असा त्रास सुरू झाला. याबाबत ‘लोकमत’ने ६ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिध्द केले. याची दखल घेत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारती दळवी यांच्या पथकाने कासेगावला भेट दिली. जि. प. चे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांनी ‘लोकमत’मध्ये या वृत्ताची शहानिशा करा, असे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा आरोग्य पथकाने पाहणी केली. संबंधित रुग्णांशी चर्चा केली असता, गेल्या काही दिवसापांसून उलट्या, जुलाब, ताप, सर्दीचा त्रास होत असल्याचे स्पष्ट केले.
यावर डॉ. दळवी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घोलप, आर. पी. जाधव, परिचारिका व आशा वर्कर्सना सूचना देऊन रुग्णांवर तातडीने उपचार करण्यास सांगितले. यानंतर स्वत: दळवी यांनी दूषित पाणी पुरवठा होत असलेल्या नळ कनेक्शनचा सर्व्हे केला.
ग्रामपंचायतीनेही जेथे जेथे गळती आहे ती काढण्याचे काम युध्दपातळीवर केले. तसेच विविध ठिकाणी वॉशआऊटही करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू झाल्याने मातंग समाजातील ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामसेवक नॉटरिचेबल..!
येथील ग्रामसेवक अनिल पाटील गेल्या काही दिवसांपासून नॉटरिचेबल आहेत. या प्रभागातील ग्रामस्थांनी त्यांच्याशी दूषित पाण्याबाबत बोलण्यासाठी भ्रमणध्वनी लावला, परंतु त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून ते नॉटरिचेबल असल्यान कामे खोळंबून आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे प्रभाग क्र. ५ चांगलाच चर्चेत राहिला आहे. शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू झाल्यानंतर आज सकाळपासून येथील सदस्य हणमंत मिसाळ व शुभांगी पाटसुते यांनी प्रभागातील गटारी स्वच्छतेचे काम हाती घेतले होते. खांबावरील नवीन दिवे बसवण्यात आले.