कडेगावला लाचेच्या मागणीबद्दल लिपिकास अटक
By घनशाम नवाथे | Published: June 6, 2024 09:28 PM2024-06-06T21:28:01+5:302024-06-06T21:28:16+5:30
गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी २४ हजाराची लाच मागितली
सांगली: खरेदी केलेल्या जमिनीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देण्यासाठी २४ हजार रूपये लाचेची मागणी केल्याबद्दल कडेगाव नगरपंचायतीचा लिपिक सागर रामचंद्र माळी (वय ३२, रा. साईनगर, कडेगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. माळी याच्याविरूद्ध कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी, कडेगाव येथील तक्रारदार यांच्या भावाने जमिन खरेदी केली होती. या जमिनीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देण्यासाठी लिपीक माळी याने २४ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी दि. २१ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जानुसार पडताळणी केली असता माळी याने तक्रारदार यांच्याकडे प्रमाणपत्र देण्यासाठी २४ हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. परंतू माळी याने नंतर प्रत्यक्षात लाच घेतली नाही. माळी याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्यावर कारवाई होण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवून गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली होती.
माळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यास परवानगी मिळाल्यानंतर गुरूवारी त्याला अटक करून कडेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. माळी याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. उपअधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडणीकर, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे यांच्या पथकाने कारवाई केली.