सांगलीत दीड लाखाची लाच घेताना कारकुनास अटक, जमिन विक्रीची परवानगी देण्यासाठी दोन लाखांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 01:30 PM2023-01-31T13:30:37+5:302023-01-31T13:31:10+5:30
त्याचबरोबर रोजगार हमी योजनेत कार्यरत असणाऱ्या लिपिक दिलीप निवृत्ती देसाई यास लाच देण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल ताब्यात घेतले
सांगली : महार वतन जमिनीची विक्री करण्यासाठी जमीन मालकाला परवानगी देण्यासाठी दीड लाखाची लाच स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडील कुळवहीवाट शाखेतील अव्वल कारकून अनंता विठ्ठलराव भानुसे (वय ५९, रा. क्रांतीनगर, विजयनगर, सांगली) याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याचबरोबर रोजगार हमी योजनेत कार्यरत असणाऱ्या लिपिक दिलीप निवृत्ती देसाई यास लाच देण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल ताब्यात घेतले आहे.
महार वतनाची जमीन विक्री करण्याची परवानगी मिळण्याकरिता तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेला अर्ज वरिष्ठांना सांगून मंजूर करून देण्यासाठी स्वत:करिता व वरिष्ठांना देण्याकरिता दोन लाखांच्या लाचेची मागणी अनंता भानुसे याने केली होती. त्याबाबत तक्रारदारांनी १९ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
विभागाने तक्रारीची पडताळणी केली. याप्रकरणात रोहयोमधील लिपिक दिलीप देसाई यांनी तक्रारदारांना भानुसे यांना लाच देण्यास प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले. चर्चेअंती भानुसे याने दीड लाखावर तडजोड केली.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहाच्या आवारात दुपारच्या सुमारास भानुसे याला लाच देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने परिसरात सापळा लावला. तक्रारदारांकडून दीड लाखाची लाच घेताना भानुसे याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
लिपिक दिलीप देसाई यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे यांच्या पथकाने केली.