‘बांधकाम’चा लिपिक लाचप्रकरणी जाळ्यात
By admin | Published: December 29, 2015 12:41 AM2015-12-29T00:41:52+5:302015-12-29T00:52:19+5:30
शिराळ्यात कारवाई : गुन्हा दाखल
सांगली/शिराळा : बिगरशेतीसाठी ‘ना हरकत’ दाखला देण्यासाठी तीन हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिराळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिकास सोमवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. रवींद्र बाबू पावले (वय ४५, रा. पावलेवाडी, ता. शिराळा, सध्या नचिकेता गौरव कुंजजवळ, शिराळा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तडवळे (ता. शिराळा) येथील एकास हॉटेल व्यवसायासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बिगरशेतीचा ना हरकत दाखला पाहिजे होता. यासाठी त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज दाखल केला होता. दाखला देण्याचे काम रवींद्र पावले याच्याकडे होते. त्याने दाखला देण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली.
चौकशीत पावले याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. सोमवारी सायंकाळी पाचच्यादरम्यान आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हरिदास जाधव यांनी पावले यास अटक केली. त्यास मंगळवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
...तरच दाखला
लाचेची रक्कम दिली तरच नाहरकत दाखला देणार, अन्यथा देणार नाही, असे पावले याने सांगितले. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकाने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांनी तातडीने तक्रारीची दखल घेऊन चौकशी केली असता, त्यामध्ये तथ्य आढळून आले.