हवामान बदलाचा द्राक्ष बागांना फटका, उत्पादन घटणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 12:39 PM2024-11-30T12:39:42+5:302024-11-30T12:40:03+5:30

द्राक्ष बागांच्या उशिरा छाटण्या : रोगांचा प्रादुर्भाव वाढला

Climate change will affect vineyards, production will decrease  | हवामान बदलाचा द्राक्ष बागांना फटका, उत्पादन घटणार 

हवामान बदलाचा द्राक्ष बागांना फटका, उत्पादन घटणार 

जालिंदर शिंदे

घाटनांद्रे : नगदी पीक व पोषक वातावरण म्हणून कवठेमहांकाळ तालुक्यातील बळीराजाने इतर पिकांना फाटा देत द्राक्ष शेतीला मोठी पसंती दिली. त्यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष लागवड क्षेत्रही वाढले आहे. परंतु कधी अवकाळी,कधी दुष्काळ,कधी रोगांचा प्रादुर्भाव तर कधी पडता बाजारभाव यांचा फटका सहन करावा लागत आहे.

चालू वर्षी तर लांबलेल्या पावसाने कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष बागांच्या उशिरा छाटण्या घेतल्यामुळे सध्या द्राक्षबागा या काही ठिकाणी फाऊरिंग स्टेजला तर काही ठिकाणी फळधारणा अवस्थेत आहेत. परंतु सध्या दिवसभर कडाक्याचे ऊन,रात्री कडाक्याची थंडी तर पहाटे धुके यामुळे द्राक्ष बागांना डाऊनी,भुरी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बळीराजाला औषध फवारणी यंत्रासह बागेत थांबावे लागत आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अगाप छाटणी घेतलेल्या बागांत फळकुज झाली आहे. त्यामुळे त्यापासून द्राक्ष बागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. चालूवर्षी मार्च,एप्रिल मध्ये खरड छाटणीच्या वेळी पाणी कमी पडल्याने व मे महिन्यात ऊन ऐवजी अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागेसाठी लागणारे पाणी व ऊन समप्रमाणात न मिळाल्याने चालू वर्षी फळधारणा ही चांगली झाली नाही. त्याचाही फटका द्राक्ष उत्पादनास बसणार आहे.

चालूवर्षी द्राक्ष बागेत कमी प्रमाणात द्राक्ष घड असल्याने आपसूकच द्राक्ष उत्पादनही घटणार आहे. त्याचा फटका द्राक्ष उत्पादनास व बेदाणा निर्मितीस ही होणार आहे. त्याची झळ आपसुकच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

आगाप छाटणी घेतलेली माझ्या द्राक्ष बागेस परतीच्या पावसाचा मोठा फटाका बसला असून फळकुज जादा झाल्याने त्याचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे. त्याचा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. -प्रशांत शिंदे, द्राक्ष बागायतदार, घाटनांद्रे.

Web Title: Climate change will affect vineyards, production will decrease 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.