पक्षाचे चिन्ह घड्याळ, ..पण माझं कधीच जमलं नाही, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 05:41 PM2022-02-07T17:41:04+5:302022-02-07T17:52:53+5:30
आता तर हात व धनुष्यबाणाच्या नादाला लागून घड्याळ्याची वेळ चुकू लागली आहे. असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
सांगली : कोणत्याही कार्यक्रमाला मला यायला नेहमीच उशीर होतो. आमच्या पक्षाचे चिन्ह घड्याळ असले, तरी माझे व घड्याळाचे कधीच जमले नाही, असे मत जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या वेळी त्यांनी अनेकांना चिमटेही काढले. जयंत पाटील हे उशिरा येण्याच्या त्यांच्या सवयीबद्दल बोलत असतानाच, त्यांना मध्येच थांबवत आमदार अनिल बाबर म्हणाले की, चिन्हाचे नाव घेऊ नका, उगीच प्रचार होईल.
त्यावर जयंत पाटील म्हणाले की, आता तर हात व धनुष्यबाणाच्या नादाला लागून घड्याळ्याची वेळ चुकू लागली आहे. यावर सभागृहात एकच हशा पिकला. लगेच स्वत:ला सावरत जयंतरावांनी हा विनोदाचा भाग आहे, असे स्पष्ट केले.
ते म्हणाले की, काही जिल्हा बँकांमध्ये आता मंत्रीही संचालक मंडळात वर्णी लावून घेत आहेत, ही गोष्ट चुकीची आहे. मंत्र्यांनी स्वत:ची वर्णी न लावता, आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज आहे. गुलाबराव पाटील यांनी नेहमी नैतिकता, स्वच्छ चारित्र्य या बळावर राजकारण, समाजकारण केले. त्यांचा अंगीकार सध्याच्या राजकारण्यांनी करायला हवा. चांगले काम केलेल्या माणसाची लोक नेहमीच दीर्घकाळ पूजा करतात, अगदी त्याप्रमाणेच गुलाबराव पाटील हे मनाने उमदे, निस्पृह असल्याने व त्यांनी सहकारात केलेल्या कामामुळे त्यांच्याबद्दल आजही राज्यभरात विलक्षण आदर आहे.
दिग्ग्ज संचालकांची दांडी
कार्यक्रमास काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व बँकेचे संचालक विशाल पाटील, बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड, राहुल महाडिक, प्रकाश जमदाडे या दिग्गज संचालकांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली होती. त्यात सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदमही हेही कार्यक्रमाच्या ठिकाणी उशिरा आले. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी याबाबतची चर्चा रंगली होती.