हाणामारी संस्कृतीला खाकीची चपराक : तासगावात बदलाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:09 AM2018-04-10T00:09:47+5:302018-04-10T00:09:47+5:30

 Clockmaking culture is a trickle: expectations of change in hour | हाणामारी संस्कृतीला खाकीची चपराक : तासगावात बदलाची अपेक्षा

हाणामारी संस्कृतीला खाकीची चपराक : तासगावात बदलाची अपेक्षा

Next
ठळक मुद्देराजकीय मक्तेदारीला तडा; कारभारी धास्तावले, कारवाईने कार्यकर्त्यांची पळताभुई थोडी

दत्ता पाटील ।
तासगाव : तासगाव पालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि राष्टÑवादीत झालेल्या हाणामारीवेळी पोलीसही टार्गेट झाले. त्यामुळे या हाणामारी संस्कृतीला पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारुन चांगलीच चपराक दिली. कारवाईच्या भीतीने अनेकजण धास्तावले असून, गायब झाले आहेत. मात्र या घटनेमुळे तालुक्यातील राजकारण्यांच्या मक्तेदारीला तडा गेला.

तासगाव तालुक्यात आर. आर. पाटील तथा आबा गट विरुध्द खासदार संजयकाका पाटील गट असे राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. या दोन्ही गटातच निवडणुका होत असतात. यात दोन्ही गटात अपवाद वगळता कायदा हातात घेण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत. अडीच वर्षापूर्वी बाजार समिती निवडणुकीत भाजप आणि राष्टÑवादीत धुमशान झाले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि भाजपमध्ये हाणामारी झाली. ग्रामपंचायत निवडणुकीतही काही गावात खुन्नस देण्याचे प्रकार झाले. नुकत्याच झालेल्या प्रभाग सहामधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा भाजप आणि राष्टÑवादीत हाणामारीची पुनरावृत्ती झाली.

निवडणूक आणि हाणामारी हे तालुक्याचे समीकरण झाले होते. यातून अनेक कार्यकर्त्यांना नुकसानीचा सामना करावा लागला होता. कायदा हातात घेऊन हम करे सो कायदा, असा अविर्भाव तालुक्यात दिवसेंदिवस वाढीस लागला होता. दोन गटात झालेल्या भांडणात प्रशासनाकडून कठोर कारवाईची भूमिका घेण्यात आली नाही. परिणामी तालुक्यात हाणामारी संस्कृती वाढली होती.

पोटनिवडणुकीतील हाणामारीत मात्र कर्तव्य बजावणारे पोलीसच शिकार झाले. त्यावेळी पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला. पोलिसांना मारहाण केलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष, गट-तट न पाहता गुन्हे दाखल करण्यात आले. इतकेच नव्हे, तर गुन्हे दाखल झालेल्यांच्या अटकेसाठीही ससेमीरा चालू झाला. पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांची स्टाईल सामान्य तासगावकरांना भावली. राजकीय मक्तेदारी आणि वरदहस्तात वावरणाऱ्या भाजप आणि राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांमुळे पळताभुई थोडी झाली. तालुक्यात होणाºया हाणामारीच्या घटनांचा केंद्रबिंदू आतापर्यंत तासगाव शहरातच होता. मात्र हा केंद्रबिंदू खाकीच्या बडग्यामुळे डळमळीत झाला आहे. शहरातील दोन्ही पक्षांतील बडे कार्यकर्ते पोलिसी कारवाईच्या धसक्याने शहरातून पसार झाले आहेत. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कारकीर्दीतदेखील झाली नाही, इतकी मोठी कारवाई यावेळी झाली आहे.

राजकारण्यांची तलवार म्यान
हाणामारीनंतर राष्टवादीकडून आ. सुमनताई पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. खा. संजयकाकांवर गुन्हा दाखल करावा, अशी प्रमुख मागणी होती. मात्र पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांच्या लेखी आश्वासनानंतर त्यांचे आंदोलन बारगळले. भाजपकडून तहसील कार्यालयासमोर पोलीस अधीक्षकांच्या बदलीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन थांबविले. पोलीसप्रमुखांच्या बदलीचा विषय गुलदस्त्यातच राहिला. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शेळके यांच्याकडे तपास कायम आहे. मागण्या मान्य न होताच दोन्ही पक्षांकडून आंदोलनाची तलवार म्यान झाली आहे.

राजकीय गोटात सन्नाटा
पोलिसांना मारहाण झाल्याप्रकरणी शंभरजणांवर गुन्हे दाखल झाले. भाजपचे चौघे, तर राष्टÑवादीचे दोघेजण सध्या अटकेत आहेत. अटकेत नसलेले सुमारे १०६ कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांच्याविरोधातील कलमे गंभीर आहेत. कारवाईच्या धसक्याने ते सध्या तासगावबाहेर आहेत. तूर्तास तरी राजकीय गोटात सन्नाटा आहे.

Web Title:  Clockmaking culture is a trickle: expectations of change in hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.