इस्लामपुरात गॅस शवदाहिनी बंद
By admin | Published: November 10, 2015 10:21 PM2015-11-10T22:21:45+5:302015-11-11T00:14:03+5:30
नगरपालिकेचे दुर्लक्ष : उत्कृष्ट कामे दाखवा अन् बक्षीस मिळवा!
अशोक पाटील -- इस्लामपूर नगरपालिकेने कापूसखेड रस्त्यानजीक स्मशानभूमी तयार केली आहे. तेथेच ५८ लाख रुपये खर्चून गॅस शवदाहिनी बसविण्यात आली आहे, पण काही महिन्यांच्या वापरानंतर ती बंद पडली आहे. दोन महिन्यांपासून नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. शहरातील इतर कामांचाही ‘फ्लॉप शो’ झाला आहे. ‘पालिकेने केलेली उत्कृष्ट कामे दाखवा अन् बक्षीस मिळवा’ अशी उपरोधिक स्पर्धा ठेवण्याची वेळ आल्याचे विरोधी नगरसेवक व काही सामाजिक संघटनांनी सांगितले.
इस्लामपूरची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पालिकेने विविध समाजांसाठी वेगवेगळ्या स्मशानभूमी बांधल्या आहेत. कापूसखेड रस्त्यानजीक अत्याधुनिक स्मशानभूमी तयार करण्यात आली आहे. येथे हिरवीगार झाडी आहे. तेथेच गॅस शवदाहिनी बसविण्यात आली आहे. त्यासाठी शासनाचे ३८ लाख व नगरपालिकेचे २0 लाख असे ५८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी तेथे एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना स्फोट झाला होता.
यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले होते. त्या प्रकारावर पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पडदा टाकून, प्रकरण बाहेर येणार नाही याची काळजी घेतली होती. मात्र तेव्हापासून शवदाहिनी बंद आहे. दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही पालिकेने दुरुस्तीबाबत कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत.
विकासकामे झाली : पण दर्जाबाबत शंका
इस्लामपूर शहरात घरकुल योजना, रस्ते, गटारी, पोहण्याचा तलाव, चौक सुशोभिकरण, एल. ई. डी. पथदिवे, गांडूळ खत प्रकल्प, वृक्षारोपण अशी अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. परंतु यातील किती कामे दर्जेदार आहेत, हा संशोधनाचा विषय असल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत.