सांगलीत तूर खरेदी केंद्र बंदच
By admin | Published: April 26, 2017 11:50 PM2017-04-26T23:50:59+5:302017-04-26T23:50:59+5:30
बारदानांचा तुटवडा : जतचे केंद्र अडकले लाल फितीत; शेतकऱ्यांमधून तीव्र संताप
गजानन पाटील ल्ल संख
तूर उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून होत असलेली लूट रोखण्याकरिता शासनाने तूर खरेदी केंद्र सुरू केले. मात्र सांगलीतील तूर खरेदी केंद्र बारदानाअभावी १० मार्चपासून बंद अवस्थेत आहे, तर जत तालुक्यातील खरेदी केंद्र अद्याप सुरूच झालेले नाही. १५ एप्रिल ही खरेदी केंद्राची मुदत संपली आहे. जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुरीचा साठा करून ठेवला आहे. केंद्र बंद झाल्याने व्यापाऱ्यांनी दर पाडला आहे.
कृषी राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यांना तूर खरेदीसाठी टाहो फोडावा लागत आहे. खरीप हंगामात कडधान्य पीक म्हणून तूर पीक घेतले जाते. कमी खर्चात, पावसावर, कमी भांडवलात व माळरानावर तूर पीक येत असल्याने शेतकऱ्यांचा हे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. गेल्यावर्षी दोन हजार हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेतले होते. यावर्षी ३४०० हेक्टर क्षेत्रावर तूर पीक घेण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळावा, याकरिता शासकीय यंत्रणा म्हणून नाफेड आणि भारतीय खाद्य निगमची निवड झाली. शासनाने नाफेड व विष्णुअण्णा पाटील खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सांगलीतील शासकीय गोदाम (सेंट्रल वेअर हाऊस) येथे तूर खरेदी केंद्र सुरू केले. दि. १३ जानेवारीपासून तूर खरेदी केंद्र सुरू झाले. मात्र १० मार्चपासून ते बंद झाले. तूर भरून ठेवण्यासाठी शासनाकडून बारदान न आल्याने खरेदी बंद झाली. त्यानंतर तूर खरेदी झाली नाही.
दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आदी भागात तूर लागवडीला विशेष महत्त्व नव्हते. परंतु शेतकऱ्यांनी पाणी टंचाईसह अन्य समस्यांशी मुकाबला करत मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली आहे. अनुकूल हवामानामुळे तुरीचे उत्पादन चांगले आले आहे. कधी नव्हे ते तुरीचे उत्पादन वाढले आहे. शेकडो टन तुरीचे उत्पादन झाले आहे.
तुरीची आधारभूत किंमत क्विंटलला ५०५० रूपये आहे. खरेदी केंद्र १५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार होते. मात्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे आधीच बंद झाले. शासनाची तूर केंद्रे बंद झाल्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये तुरीचा दर कोसळला आहे. तो तीन हजार रूपयापर्यंत आला आहे.
तूर बराच वेळ साठवल्यास ती खराब होऊन नुकसान होणार आहे. त्याला कीड लागते. सध्या ही तूर काढून चार महिने लोटले आहेत. दर कमी झालेले आहेत. जिल्ह्यात फक्त ५७ दिवस तूर खरेदी केंद्र सुरू होते. बारदानाअभावी जवळजवळ ३५ दिवस ते बंद होते. मार्केट यार्डातील खरेदी केंद्रात ४२७६ क्विंटल तूर खरेदी झालेली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेऊन, ३५ दिवस बंद असलेले खरेदी केंद्र पुन्हा सुरू करून त्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.
कर्नाटकात सेवा सोसायटीला अधिकार
कर्नाटकमध्ये शासनाने सेवा सोसायटीमध्ये खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. शेतकऱ्याची २० क्विंटल तूर आधारभूत भावाने ५५०० रूपयाने खरेदी केली जाते. ५१०० रूपये दर व राज्य शासनाचे ४५० रूपये अनुदान आहे. मात्र शेतकऱ्यांचा सात-बारा, खाते उतारा, आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. तेथेसुध्दा १० एप्रिल ही खरेदीची ‘डेडलाईन’ होती. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीनुसार २० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिलेली होती.
जत येथील खरेदी केंद्र दफ्तरदिरंगाईत
तूर खरेदी केंद्र जत येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केंद्र सुरू होणार होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना तुरीची विक्री करणे सुलभ होणार होते. गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेतच राहिले. हा शासनाच्या दफ्तरदिरंगाईचा फटका बसला आहे.