महापालिकेतील तमाशा बंद करा
By Admin | Published: August 28, 2016 12:21 AM2016-08-28T00:21:21+5:302016-08-28T00:21:21+5:30
पतंगरावांनी खडसावले : महापालिका पदाधिकारी, नगरसेवकांची सांगलीत बैठक
सांगली : लोकांच्या हिताचे राजकारण झाले पाहिजे. भ्रष्टाचार, गटबाजी, वाद अशा गोष्टींचा महापालिकेतील तमाशा आता बंद करा, अशा शब्दात कॉंग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांनी शनिवारी महापालिका पदाधिकारी आणि नगरसेवकांना खडसावले. स्थायी समितीच्या तीन सदस्यांच्या निवडीसाठी आयोजित बैठक कोणत्याही निर्णयाविना पार पडली.
कदम यांच्या निवासस्थानी सायंकाळी बैठक आयोजित केली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले की, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडून महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. प्रभागनिहाय विकासकामांची स्थिती, शहरातील प्रश्न, अडचणी याबाबत चर्चा झाली. सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात थोडी कामे जास्त होत असली तरी, अन्य पक्षीय सदस्यांच्या प्रभागातही कामे झाली पाहिजेत. प्रश्न लोकांशी निगडीत असल्याने लोकहितासाठी कारभार असला पाहिजे. नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी आम्ही कष्ट करायचे, पक्ष म्हणून मदत करायची आणि सत्ता आल्यानंतर यांचा ठरलेला कारभार चालायचा. यापुढे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत लगेच खुलासा केला पाहिजे. मौन बाळगून राहू नये. लोकांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे.
महापालिकेत फक्त कॉंग्रेसचाच गट आहे. अन्य गटबाजी चालणार नाही. ज्यांना आपले वेगळे अस्तित्व राखायचे आहे, असे लोक स्वतंत्र पाल उभी करतात. अशी पालं उभारणारे आजवर अनेक पाहिलेत. अशांचे काही साध्य होत नाही. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये तीन सदस्य कॉँग्रेसला निवडायचे आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची की अनेकदा निवडून येऊनही ज्यांना संधी मिळाली नाही, अशांना संधी द्यायची, याबाबत निर्णय झालेला नाही. चर्चा सुरू आहे. लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सांगली झटक्यात बळकवताहेत...
गेली कित्येक वर्षे मी सांगलीतील राजकारणात सक्रिय आहे. आम्हाला कधीच ज्या गोष्टी जमल्या नाहीत, त्या गोष्टी भाजपचे नेते झटक्यात करीत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा बळकाविण्याचे कसब त्यांनाच जमलेले आहे, अशी उपहासात्मक टीका कदम यांनी पृथ्वीराज देशमुख यांचे नाव न घेता केली.
माझ्याविरुद्ध आजपर्यंत अनेकांनी कट केला आहे. अगदी मुंबईपासून कट सुरू असतो. तरीही मी माझ्या मतदारसंघात निवडून येतो. सांगलीतील जनता शहाणी आहे. त्यामुळेच अशा कटकारस्थानांचे माझ्यापुढे काही चालले नाही, असे मत कदम यांनी व्यक्त केले.
विधानपरिषदेचा निर्णय कोअर कमिटी बैठकीत
सांगली-सातारा विधानपरिषदेचे तिकीट राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसने घ्यावे आणि ते सांगलीसाठी राखीव ठेवावे, अशी मागणी कॉंग्रेसमधून झालेली आहे. तरीही राज्यातील अन्य जागांचा ताळमेळ पाहून याबाबतचा निर्णय रविवार, दि. २८ आॅगस्ट रोजी होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला जाईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.
मागील विधानसभा निवडणूक माझ्यासाठी शेवटचीच असल्याचे मी जाहीर केले होते, मात्र लोकांची इच्छा असली आणि त्यांनी आग्रह केला तर, पुन्हा मैदानात उतरू शकतो, असे कदम यांनी सांगितले.