नेट कनेक्टिव्हिटीअभावी पोस्टाचे व्यवहार बंद
By admin | Published: November 19, 2015 12:33 AM2015-11-19T00:33:24+5:302015-11-19T00:38:11+5:30
कामेरीतील प्रकार : ग्राहकांमधून तीव्र नाराजी; केबल तुटल्याचे कारण
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय महामार्गालगत दूरसंचार विभागाची ओएफसी केबल तुटल्याने गेल्या दोन दिवसांपासून पोस्टाचे सर्व व्यवहार नेट कनेक्टिव्हिटीअभावी ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना काम करून घेण्यासाठी ताटकळावे लागत आहे. एवढे होऊनही दुरूस्तीकडे संबंधितांकडून कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोस्ट खात्याने नुकतेच कामेरीसह ग्रामीण भागातील बहुतांशी पोस्ट कार्यालयातील व्यवहार आॅनलाईन पध्दतीने सुरू केले आहेत. त्याची परिपूर्ण माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना नसल्याने त्यांचा गोंधळ उडत आहे. त्यातच नेट कनेक्टिव्हिटी मिळण्याची खात्री ग्रामीण भागामध्ये देता येत नसल्याने बहुतांशवेळा ही सेवा ठप्पच असते. दूरसंचार विभागाचे कर्मचारीही नेट कनेक्टिव्हिटीबाबतच्या तक्रारीची दखल गांभीर्याने घेत नाहीत, असा अनुभव आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडीनजीक ओएफसी केबल तुटली आहे. याबाबत पोस्ट अधिकाऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून पोस्टातील आरडी भरणा, आरडी मॅच्युरिटी, एमआयएस व सेव्हींग खात्यातील पैसे मिळणे यासह पोस्टातील गुंतवणुकीवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
तरी दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोस्ट खात्याचा आॅनलाईन कारभार चालण्यासाठी तात्काळ तुटलेल्या केबलची दुरूस्ती करून नेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
केबल तुटण्याचे प्रकार नेहमीचेच
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडीनजीक ओएफसी केबल तुटली आहे. केबल तुटण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. आता मात्र बँकींग बरोबर पोस्टातील व्यवहारही आॅनलाईन होत असल्याने याचा मोठा फटका ग्रामस्थांना बसत आहे. याबाबत पोस्ट अधिकाऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.